ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी महाएल्गार यात्रा आयोजित केली. या महाएल्गार यात्रेनिमित्त लक्ष्मण हाके बीड जिल्ह्यातील कासार तालुक्यातील मातोरी गावात आलेले असताना बसस्टॅँडवर दगडफेक झाली. या घटनेत काहीजण जखमी असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही एक्स पोस्टद्वारे माहिती दिली आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे पाटील गेले वर्षभर आंदोलन करत आहेत. तर, ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होईल, यामुळे ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अशा मागणीसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघामारे यांनीही उपोषण छेडलं होतं. दरम्यान, लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी सरकारने त्यांना आश्वासन दिल्याने त्यांनी हे उपोषण मागे घेतलं. त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आलाय. रुग्णालयातून परतल्यानंतर त्यांनी आपल्या अभिवादन दौऱ्याला सिंदखेड राजा येथून सुरुवात केली. हेही वाचा >> “लंडनमधील पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती चांगली”, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला या दौऱ्यात त्यांच्याकडे डीजेसह अनेक उपकरणे होते. प्राथमिक वृत्तानुसार डीजे वाजवण्यावरून दोन गट आमने सामने आले. यावेळी मातोरी येथील बसस्टॅण्डवर दगडफेक झाली. या दगडफेकीनंतर गावात तणावपूर्ण शांतता होती. त्यामुळे पोलिसांनी येथे सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. धनंजय मुंडे यांचं आवाहन दगडफेकीच्या घटनेनंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एक्सवर पोस्ट केली. ते म्हणाले, "बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात मातोरी परिसरात घडत असलेल्या घटनाक्रमावर मी लक्ष ठेवून आहे. पोलीस प्रशासनास तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश दिले आहेत. माझी बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला विनंती आहे की कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, तसेच जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द बिघडू देऊ नये." बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात मातोरी परिसरात घडत असलेल्या घटनाक्रमावर मी लक्ष ठेवून आहे. पोलीस प्रशासनास तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश दिले आहेत. माझी बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला विनंती आहे की कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणीही प्रयत्न…— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 27, 2024 या दगडफेकीत अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. काही गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. याप्रकरणी अधिक चौकशी पोलिसांकडून केली जातेय. दुसरीकडे सोशल मीडियावर या दगडफेकीसंदर्भात वेगळीच चर्चा पाहायला मिळतेय.