Video : “महाराष्ट्रात माकडांचा खेळ सुरू आहे, एका…”, ओवेसींची शिवसेनेतील बंडखोरीवर खोचक प्रतिक्रिया!

ओवेसी म्हणतात, “संजय राऊत म्हणत असतील की शिवसैनिक रस्त्यावर उतरतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. महाविकास आघाडी बघून घेईल”

AIMIM chief Asaduddin Owaisi
(फोटो सौजन्य -ANI)

एकनाथ शिंदे यांचं बंड आणि त्यापाठोपाठ महाविकास आघाडी सरकार टिकणार की नाही याची सुरू झालेली चर्चा, यामुळे राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट असा सामना राज्यात पाहायला मिळत आहे. बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये असून ते भाजपाला समर्थन देऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारकडून सरकार अल्पमतात नसल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार आणि अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी एएनआयशी बोलताना खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रात नेमकं घडतंय काय?

‘शिवसेना बाळासाहेब’ असं नाव एकनाथ शिंदेंसोबतच्या बंडखोर आमदारांनी आपल्या गटाला दिलं आहे. भाजपासोबत सत्ता स्थापन करावी, अशी अट त्यांनी शिवसेना नेतृत्वाला घातली आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. त्यात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बंडखोरांपैकी १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली असून त्यांना दोन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा लढा आता न्यायालयात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संजय राऊतांचं बंडखोर आमदारांना खुलं आव्हान; म्हणाले, “तुमच्यात हिंमत असेल तर…!”

“काय करायचं ते पाहून घेतील”

दरम्यान, याविषयी बोलताना असदुद्दीन ओवेसी यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. “मला त्यांच्याबाबतीत काहीही बोलायचं नाही. हा महाविकास आघाडीचा अंतर्गत मुद्दा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आमची मोठी भूमिका असेल. पण या मुद्द्यामध्ये ते पाहून घेतील काय करायचं ते. संजय राऊत शिवसैनिक रस्त्यावर येतील म्हणत असतील तर ते बघतील. महाविकास आघाडी बघेल त्याचं काय करायचं ते. आम्हाला काय करायचंय त्यात. मी त्यात विनाकारण माझा हात का घालू?” असं ओवेसी म्हणाले.

“हिंदुत्व शब्द लिहिता येतो का?” गुलाबराव पाटील, भुमरे ते संजय शिरसाट; संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना केलं लक्ष्य

“आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. सध्या तिथे माकडांचा खेळ सुरू आहे. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत आहेत. कुणी या झाडावर आहे, कुणी दुसऱ्या झाडावर जात आहे. आम्ही बघतोय हा सगळा तमाशा”, अशा शब्दांत ओवेसींनी खोचक टोला लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asaduddin owaisi on maharashtra politics happening eknath shinde shivsena pmw

Next Story
सांगोल्याला डोंगर झाडी नाही का? संजय राऊतांचा शहाजीबापू पाटलांना टोला
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी