शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविकांची मदत

शेतकरी आत्महत्येसारखे प्रकार थांबविण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गावागावांत जाऊन शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यात येईल, तसेच आत्महत्येसारख्या प्रकाराकडे शेतकऱ्यांनी प्रवृत्त होऊ नये, यासाठी त्यांचे समुपदेशनही केले जाणार आहे.

शेतकरी आत्महत्येसारखे प्रकार थांबविण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गावागावांत जाऊन शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यात येईल, तसेच आत्महत्येसारख्या प्रकाराकडे शेतकऱ्यांनी प्रवृत्त होऊ नये, यासाठी त्यांचे समुपदेशनही केले जाणार आहे. यासाठी या आशा कार्यकर्तीना वेगळे मानधन देण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात शेतकरी मानसिक समुपदेशन कार्यक्रमास डॉ. सावंत यांच्या हस्ते प्रारंभ झाला. जि.प.चे अध्यक्ष धीरज पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, आरोग्य सहसंचालक डॉ. सुनीता तायडे, उपसंचालक डॉ. पाटील आदींची या वेळी उपस्थिती होती. डॉ. सावंत यांनी या निमित्ताने आशा कार्यकर्तीशी संवाद साधला. शेतकरी आत्महत्या थांबविण्यात आरोग्य विभाग महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविका यांचा गावांत चांगला संपर्क, तसेच प्रत्येक कुटुंबाशी संवाद असतो. हा सुसंवाद अधिक वाढवून आशा कार्यकर्त्यां शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांचे मनोबल वाढविणार आहेत. शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घ्या, जेणेकरून शेतकरी मन मोकळे करू शकेल. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण आशा कार्यकर्तीना देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. उस्मानाबाद, यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी ५ तालुक्यांत  प्रायोगिक तत्त्वावर हा कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील आठही तालुक्यांत हा उपक्रम राबविणार आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणे म्हणजे त्यांना नवसंजीवनी देणारे काम आहे. आशा कार्यकर्ती हे काम करतील, याचा विश्वास असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. हे काम कठीण असले तरी संवेदनशील आहे. हे काम करणाऱ्या आशा कार्यकर्तीना वेगळा मोबदला दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Asha anganwadi servant ahead for farmer motivate