अहिल्यानगर: आपल्या वैविध्यपूर्ण गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशा भोसले यांनी शहरातील दत्त देवस्थानमध्ये (वेदांतनगर) दोनवेळा गायनसेवा रुजू केली होती. त्यांच्या या गायनाच्या स्मृती आजही भक्तगण व देवस्थानच्या सेवेकाऱ्यांमध्ये ताज्या आहेत. गायनसेवेच्या वेळी आशा भोसले यांचा गुरुदेव रामकृष्ण महाराज यांनी त्यांचा साडीचोळी देऊन गौरव केला होता. आशा भोसले, लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर व मंगेशकर कुटुंबातील इतर सदस्य चारवेळा देवस्थानमध्ये दर्शनाला आले होते. याशिवाय क्षीरसागर महाराज मुंबईत उपचारासाठी दाखल असतानाही त्यांची आशा भोसले यांनी रुग्णालयात भेट घेतली होती.
शहरातील प्रसिद्ध दत्त देवस्थान येथे २२ नोव्हेंबर १९९३ मध्ये रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या षठ्यब्दी पुर्तीनिमित्त रौप्यतुला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भक्तांच्या वतीने देवस्थानच्या आवारात ‘अमृताचा घनु’ हा आशा भोसले यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर व साहित्यिक, व्याख्याते राम शेवाळकर यांनी निरुपण केले होते. हा कार्यक्रम सुमारे साडेचार तास रंगला. ज्ञानेश्वरांचे अभंग गात त्यांनी उपस्थितांना मंत्रमुक्त केले होते.
यावेळी देवस्थानच्या वतीने आशा भोसले यांचा सन्मानही करण्यात आला. गुरुदेवांच्या ज्येष्ठ भक्त मंदा जोशी यांच्याकडे या संदर्भातील माहिती उपलब्ध आहे. देवस्थानचे विश्वस्त ॲड. मिलिंद क्षीरसागर यांनीही या कार्यक्रमाच्या आठवणींना उजाळा देताना कार्यक्रम साडेचार तास रंगला होता असे सांगितले. त्यापूर्वीही आशा भोसले लता मंगेशकर देवस्थानमध्ये दर्शनासाठी आलेल्या होत्या. आशा भोसले यांचा त्यानंतरही १९९५ मध्ये गायनसेवेचा कार्यक्रम देवस्थानच्या आवारातील मैदानावर झाल्याची आठवण देवस्थानचे सेवेकरी रावसाहेब थोरवे यांनी सांगितली.
अळूची पातळ भाजी आवडली
‘अमृताचा घनु’ या कार्यक्रमापूर्वी तीन वर्ष आधी आशा भोसले, लता मंगेशकर देवस्थानमध्ये दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी क्षीरसागर महाराजांनी त्यांना प्रसादभोजन घेण्यास सांगितले. परंतु दोघी गायिकांनी बाहेर जेवत नसल्याचे सांगितले. त्यावर महाराजांनी त्यांना काही त्रास होणार नाही, असे स्पष्ट केले. त्यावर दोघींनीही देवस्थानमध्ये प्रसादभोजन घेतले. या प्रसादभोजनातील अळूची पातळ भाजी आशा भोसले यांना आवडली होती. त्यांनी त्यासाठी आपण परत येऊ, असेही सांगितले होते, अशी आठवण मंदा जोशी यांनी नोंदवली.
रूग्णालयात भेट
दत्त देवस्थानचे गुरुदेव क्षीरसागर महाराज १९९९ मध्ये आजारपणात उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल होते. त्या खालच्या मजल्यावर अभिनेता कमल हसन यांच्या पत्नीवर उपचार सुरू होते. त्यांना भेटण्यासाठी आशा भोसले लीलावती रुग्णालयात आल्या होत्या. एका भक्ताने त्यांना वरील मजल्यावर गुरूदेवांवर उपचार सुरू असल्याचे सांगितल्यावर आशा भोसले आधी गुरुदेवांकडे गेल्या व त्यांनी विचारपूस केली. त्यानंतर त्या कमल हसन यांच्या पत्नीच्या भेटीसाठी गेल्या. याची माहिती हृदयनाथ मंगेशकर यांनीच शहरातील सहकार सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात दिल्याचे देवस्थानचे सेवेकरी रावसाहेब थोरवे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
