ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं. आशा भोसले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शनिवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचे सगळे अवयव उपचारांदरम्यान निकामी होत गेले आणि त्यांचं निधन झालं अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली. उद्या लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईश्वरी आवाज हरपला म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आशा भोसले या सर्वात व्हर्सटाइल गायिका होत्या-देवेंद्र फडणवीस
आशा भोसले यांचं निधन झालं. सर्वात व्हर्सटाईल गायिका म्हणून त्यांचा लौकिक होता. आशाताईंनी तोरा मन दर्पण कह लाये अशा प्रकारचं क्लासिकल गाणंही म्हटलं आणि त्याचवेळी अतिशय आधुनिक गाणीही त्यांनी म्हटली. शास्त्रीय संगीत, पॉप, रॉक असो भावगीत असो २० पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी गाणी म्हटली. नव्वदाव्या वर्षी तीन तास कॉन्सर्ट करणाऱ्या आशाताई होत्या. अत्यंत खडतर आयुष्य जगत आशा भोसले इथपर्यंत पोहचल्या होत्या. रेडिओ जॉकीजचा जो कार्यक्रम आम्ही घेतला होता त्यात त्यांनी मला दोन ओळी गुणगुणायला लावल्या होत्या, त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या बघा मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यालाही गायला लावू शकते. असं अतिशय जिंदादील व्यक्तिमत्व म्हणजे आशाताई होत्या. त्यांच्या स्वरांमध्ये परमेश्वर होता. अशा गायिकेचं जाणं ही अत्यंत दुःखद बाब आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ईश्वरी आवाज लाभलेल्या आशाताई होत्या-फडणवीस
कुठल्याही कार्यक्रमाचा प्राण म्हणजे आशाताई असायच्या. ९० व्या वर्षीही त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. आशाताईंचा १०० वा वाढदिवस आपण साजरा करु अशी अपेक्षा आम्हाला होती. पण काळाने ती संधी दिली नाही. ईश्वरी आवाज असलेल्या आमच्या गायिका आपल्यातून निघून गेल्या. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. संगीतासाठी हा दिवस दुःखद आहे. आशा भोसले यांचं निघून जाणं हे देशासाठी आणि संपूर्ण जगासाठी दुःखद बातमी आहे. भारताच्या इतिहासात आशाताई, मंगेशकर कुटुंब यांनी जी सेवा केली त्याला तोड नाही. लतादीदी नावाचा एक ताऱ्याचा अस्त झाला, त्यानंतर आज आशाताई नावाचा तारा या दुसऱ्या ताऱ्याचा अस्त झाला असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
