चिरतरुण आवाजाचं वरदान लाभलेल्या गायिका म्हणजे आशा भोसले. त्यांचं मुंबईत वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. आशा भोसले यांचे चिरंजीव आनंद भोसले आणि भाजपाचे नेते तसंच मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. दरम्यान आशा भोसलेंच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण राज्यावर आणि देशावर शोककळा पसरली आहे. दि लास्ट एम्परर असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आशाताईंबाबत पोस्ट लिहिली आहे आणि त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

‘आशाताई’ -दि लास्ट एम्परर

ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात. लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातलं परफेक्शन, कमालीचा आखीवरेखीवपणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं.

आशाताईंनी अफाट त्रास सहन केला, त्यामुळेच त्यांच्या आवाजात धिटाई

‘गाणं हे माझं पॅशन आहे’ किंवा ‘ऍक्टिंग माझं पॅशन आहे’ असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळतात. असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या १५व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला. पण या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतुपरंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली.

आशाताईंनी एक्स्प्रेशनचं गाणं मिळायला काय पेशन्स ठेवले असतील…

मी वर म्हणल्याप्रमाणे लतादीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशावेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत. ‘पिया तू अब तो आजा’ मध्ये प्रियकराला थेट बेधडक आवाहन आहे. ‘आईये मेहरबान’ मध्ये लडिवाळपणा आहे, ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए’ मध्ये नजाकत आहे. ‘दम मारो दम’ मध्ये बंडखोरी आहे, सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे. याच आशाताई मराठी भावसंगीतात ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ म्हणत युगायुगांचं वैराग्याचे प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात.

आशाताई कधीही खचल्या नाहीत..

व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वादळं पहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत, दुःख हत्यार बनवलं नाही, कडवटपणा येऊ दिला नाही. दुःख हाताळायची त्यांनी कलाच जणू आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या. जसा दीदींचा सहवास मिळाला तसाच आशाताईंचा मिळाला. मी भाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील.

जसं लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसाँस युगाला त्या दोघांनी वेगेवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लतादीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या रेनेसाँस युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला !

आशाताईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली.

राज ठाकरे

अशी पोस्ट राज ठाकरेंनी लिहिली आहे आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि आशा भोसले तसंच मंगेशकर कुटुंब यांचा खास जिव्हाळा होता. आशा भोसले यांच्या निधनानंतर राज ठाकरे चांगलेच भावूक झाले आहेत आणि त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे हे दिसून येतं आहे.