Asha Bhosle Singing Video Viral on Social Media: प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील सुवर्णयुग आज संपले. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले. दरम्यान, त्यांचा काही दिवसांपूर्वीचा एक व्हिडिओ आशिष शेलार यांनी सोशल मीडियावर प्रसारित केला आहे.
२० हून अधिक भाषांमध्ये आणि जवळपास सर्वच प्रकारच्या जॉनरमध्ये गाणं गायलेल्या आशा भोसले यांची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. त्यांची अनेक गाणी अजरामर झाली असून भक्तीगीत, नाट्यगीत असो किंवा कॅब्रे असो कुठल्याही गाण्याचं आव्हान त्या लीलया पेलत असत. दरम्यान, “ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर…” हे भजन नुकतंच आशा भोसले यांनी गायलं होतं. तेव्हाचा व्हिडिओ आशिष शेलारांनी शेअर केलाय.
“भोगल्या दु:खाचे आनंदी गाणे गाण्याची ताकद असलेल्या… जय शारदे.. वागेश्वरीची प्रार्थना गाणाऱ्या… कॅब्रे, लावणी, भक्ती गीत, ओवी आणि अभंगासह भावगीत, चित्रपट गीत ही विलक्षण ताकदीने गाणाऱ्या… भाषेची बंधने तोडून २० पेक्षा जास्त भाषेत गाणाऱ्या… स्वतःच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला लिलया हरवणाऱ्या… आणि भाऊबीजेला “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती…” अशी अजरामर ओवाळणी गाणाऱ्या आशाताई गेल्या”, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी त्यांच्या भावना मांडल्या.
“माझ्यासाठी तर माझी प्रिय बहिण मी आज गमावली… साक्षात सरस्वतीच्या वीणेची झंकार आज शांत झाली. मला भाऊ म्हणून उदंड प्रेम त्यांनी दिले. मी आज काय गमावले हे शब्दात सांगता येणार नाही…माझ्या जगण्यातील श्रीमंती मात्र आज गमावली… त्यांच्या असंख्य भेटी माझ्या हृदयात साठवलेल्या आहेत… काही दिवसांपूर्वीची ही एक संस्मरणीय भेट”, असं म्हणत त्यांनी आशा भोसले यांच्या गाण्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
हा व्हिडिओ आशिष शेलारांनी प्रसिद्ध केला असून जगण्यातील श्रीमंती गमावली, असं त्यांनी म्हटलं आहे.
