Asha Bhosle Restaurant Chain details: सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनामुळे संपूर्ण संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. आशा भोसलेंनी स्वरबद्ध केलेली गाणी अजरामर ठरणार आहेत. त्यांचं गाणं प्रत्यक्षात ऐकायचं म्हणजे याची देही याची डोळा स्वर्गसुख अनुभवल्यासारखं असल्याचं अनेक रसिकप्रेक्षक सांगतात. पण अनेकांना हे माहित नाही की आशा भोसले यांची सर्जनशीलता केवळ रेकॉर्डिंग स्टुडिओपुरती मर्यादित नव्हती. त्या ‘आशाज्’ (Asha’s) नावाच्या भारतीय फाईन-डायनिंग रेस्टॉरंटच्या जागतिक साखळीमागील मुख्य शक्ती देखील आहेत. २००२ मध्ये एका छंदातून सुरू झालेला हा प्रकल्प आता भारताचा समृद्ध वारसा परदेशात कसा पोहचू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो, याचं प्रतीक बनला आहे.
दुबईच्या वाफी सिटी मॉलपासून सुरू झालेला हा प्रवास आता मध्य पूर्व आणि युनायटेड किंगडमपर्यंत पसरला आहे. अनेक सेलिब्रिटींचे व्यवसाय जितक्या वेगाने सुरू होतात तितक्याच वेगाने बंद पडतात, पण आशा भोसले यांची रेस्टॉरंट्स दोन दशकांहून अधिक काळ टिकून आहेत.
‘आशाज्’मागील प्रेरणा
संगीत आशा भोसलेंचा प्राण होता, त्याचप्रमाणे स्वयंपाक हा त्यांचा छंद होता. संगीत क्षेत्रात नाव कमावण्यापूर्वीच त्या स्वयंपाकघरात नवनवीन प्रयोग करत असत. मुलाखतींमध्ये त्यांनी अनेकदा सांगितले आहे की, वडिलांच्या नाटक कंपनीसोबत प्रवास करताना त्यांच्या मनात स्वयंपाकाची ओढ निर्माण झाली. त्यांनी एकदा आठवण सांगितली होती, “माझं बालपण जादुई होतं, वडिलांच्या नाटक कंपनीसोबत आम्ही गावोगावी फिरायचो. कंपनीचे सर्व लोक एकत्र जेवायला बसायचे. मला मोठ्या कढईत शिजणारे अन्न पाहायला आवडायचं, त्याहीपेक्षा जास्त आनंद मला जेवणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मिळायचा. तिथूनच माझ्या स्वयंपाकाच्या आवडीची सुरुवात झाली.” याच आवडीमुळे त्यांनी आशाज नावाने रेस्टॉरंट सुरू केले.
‘आशाज्’चा जन्म: दुबई ते जगभर
२००२ मध्ये आशा भोसले यांनी वाफी (WAFI) ग्रुपसोबत भागीदारी करून दुबईत पहिले ‘आशाज्’ सुरू केले. संकल्पना साधी पण महत्त्वाकांक्षी होती. भारतीय खाद्यसंस्कृतीचा आनंद एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील आलिशान वातावरणात घेता यावा, पण त्याची अस्सल चव हरवू नये. पहिल्याच रेस्टॉरंटला प्रचंड यश मिळाले. त्यामुळे अबू धाबी, दोहा, बहरीन, कुवेत, मँचेस्टर आणि बर्मिंगहॅम यांसारख्या शहरांमध्ये त्याचा विस्तार झाला. आज ‘आशाज्’ हे परदेशातील भारतीय फाईन-डायनिंगमधील एक विश्वसनीय नाव बनले आहे. या हॉटेलांमध्ये कोणतेही महागडे मसाले वापरले जात नाहीत. त्या घरासाठी जे मसाले तयार केले जाताता तेच मसाले त्यांच्या जगभरातील रेस्टॉरंट्समध्ये वापरले जातात.
मेनूमध्ये काय असतं?
‘आशाज्’चा मेनू हा उत्तर-पश्चिम भारतीय पाककृतींचा एक स्वादिष्ट प्रवास आहे. यामध्ये प्रामुख्याने चविष्ट कबाब, सुगंधी बिर्याणी, डाळ आणि करी यांचा समावेश असतो.
काही खास पदार्थ:
भट्टी का चाप: सुगंधी मसाल्यात मॅरीनेट केलेले स्मोकी लॅम्ब चॉप्स.
केरळ चिली गार्लिक प्रॉन्स: तिखट चवीचे कोळंबीचे खास पदार्थ.
मकई सीख कबाब: कॉर्न आणि हर्ब्सपासून बनवलेला शाकाहारी पदार्थ.
फिश बिर्याणी: मसाल्यांनी युक्त अशी सुगंधी माशांची बिर्याणी.
केवळ रेस्टॉरंट नाही तर त्यापलीकडे…
‘आशाज्’ केवळ घराची आठवण येणाऱ्या भारतीयांनाच आकर्षित करत नाही, तर जागतिक स्तरावर भारतीय अन्नाकडे बघण्याचा दृष्टिकोनही या ब्रँडने बदलला आहे. भारतीय जेवण हे केवळ ‘कम्फर्ट फूड’ नसून ते फ्रेंच किंवा इटालियन जेवणाप्रमाणेच दर्जेदार आणि उच्च दर्जाचे असू शकते, हे त्यांनी सिद्ध केले.
