सातारा : सातारा जिल्ह्यात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि विठ्ठल मंदिररात भजन, कीर्तन, फराळ वाटप, विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि हरिनामाच्या गजरात धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावर्षी मुस्लिम धर्माचा मोहरम हा सण मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात तसेच सातारा शहरातील मानाच्या जंगी ताबूतची मिरवणूक काढून साजरा करण्यात आला. आषाढ शुद्ध एकादशीला वर्षातील सर्वात मोठी आषाढी एकादशी म्हणून वैष्णव भक्त हे उपवासाचे व्रत करतात. आषाढ शुद्ध एकादशीला हिंदू धर्माचा चातुर्मासास आजच मोठ्या उत्साहात धार्मिक उपक्रमांनी प्रारंभ झाला.
सातारा शहरासह जिल्ह्यातील वाई, कोरेगाव, महाबळेश्वर, पाचगणी, खंडाळ, लोणंद, म्हसवड, गोंदवले, फलटण, वडूज येथील विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी दिवसभर तसेच रात्री उशिरापर्यंत गर्दी केलेली होती. सर्वत्र विठ्ठल मंदिरांत भजन, कीर्तन, फराळ वाटप आणि आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट लक्षवेधक होती. आकर्षक फुलांनी सजवलेल्या गाभाऱ्यामध्ये विठ्ठल-रुक्मिणीला अलंकारयुक्त पोशाख घालण्यात आले होते. हरिनामाचा गजर सुरू होता. जावली तालुक्यातील प्रति पंढरपूर करहर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज पहाटे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. वेळी आमदार शशिकांत शिंदे, वसंतराव मानकुमरे, सौरभ शिंदे, ज्ञानदेव रांजणे, जयदीप शिंदे, तहसीलदार हणमंत कोळेकर, सरपंच सोनाली यादव व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर भाविकांनी दर्शन घेण्यासाठी जिल्हाभरातून मोठी गर्दी केली होती.
शहरातील श्री गवई विठ्ठल मंदिर,घाटगे विठ्ठल मंदिर,श्री पंचपाळे हौद दुर्गा माता मंदिरात दुर्गा मातेची श्री विठ्ठल रूपातील बांधण्यात आलेली पूजा विशेष लक्षवेधक होती. संगम माहुली येथील राही-रुक्मिणी विठ्ठल मंदिर, उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील राधाकृष्ण मंदिरातही विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते.
समर्थ सेवा मंडळ सज्जनगडच्या वतीने चातुर्मास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजवाडा येथे व्यापाऱ्यांनी उपवासाच्या खिचडीचा प्रसाद वितरित केला. सर्वत्र उत्साह होता. मंदिराबाहेर तुळशी, बुक्का, विविध सुवासिक फुले यांच्या विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले होते. मिठाई विक्रेत्यांकडे उपवासासाठी लागणारे फराळाचे पदार्थ खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली होती.
मुस्लिम धर्माचा मोहरम हा सण मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात शहरातील व जिल्ह्यात मानाच्या जंगी ताबूतची मिरवणूक काढून साजरा करण्यात आला. यानिमित्त सामुदायिक प्रार्थना मशिदीत तसेच ईदगाह मैदानावर करण्यात आली. ताबूच्या दर्शनासाठी सातारा शहरातील मंगळवार पेठेतील जंगी वाडा, वाईतील निमजगा येथे भक्तांनी गर्दी केली होती. तसेच वाघ अर्थात अंगावर चट्टे, पट्टे ओढून नवस बोललेल्या मुलांची मिरवणूक काढण्यात आली होती.