अहिल्यानगर: आषाढी वारीसाठी जिल्ह्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या दिंड्यांतील वारकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, वीजपुरवठा, मुक्कामाची व्यवस्था, फिरती स्वच्छतागृहे, आरोग्यसुविधा तसेच सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.
‘आषाढी वारी – २०२६’ नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध सुचेना केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, संत निळोबाराय पालखीचे अध्यक्ष अशोक सावंत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, देवीदास महाराज म्हस्के, मानाच्या पालख्यांचे प्रमुख, विविध दिंडीप्रमुख तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. हजारो वारकरी पायी प्रवास करतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसह सर्व मूलभूत सुविधांची प्रभावी व्यवस्था करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. ज्या गावांमध्ये अथवा शहरांमध्ये दिंड्यांचा मुक्काम होणार आहे, त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले.
दिंडी मार्गावर वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप उभारावेत. आवश्यकतेनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमधील खोल्याही उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी नमूद केले. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी तसेच महत्त्वाच्या ठिकाणी आरोग्य पथके तैनात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. आवश्यक औषधसाठा, मनुष्यबळ आणि रुग्णवाहिका उपलब्ध ठेवून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळतील, याची दक्षता घ्यावी. दिंडीदरम्यान पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता नियमित तपासण्याबरोबरच मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक इंधन व्यवस्थाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
आषाढी वारीदरम्यान प्रभावी समन्वय राखण्यासाठी सर्व विभागांच्या नोडल अधिकाऱ्यांची संपर्क सूची तयार करावी. अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक नमूद करून तातडीच्या समन्वयासाठी व्हॉट्सॲप समूह तयार करावा. जिल्हा आणि तालुका स्तरावर हेल्पलाईन क्रमांक सुरू करून त्याची माहिती प्रत्येक दिंडीपर्यंत पोहोचवावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी दिंडी मार्गावरील वाहतुकीचे प्रभावी नियमन करण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. मुक्कामाच्या ठिकाणीही पोलीस कर्मचारी नियुक्त करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यावर भर द्यावा, दिंडी मार्गावरील रस्त्यांची डागडुजी, खड्डे भरणे आणि आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
संत निळोबाराय पालखी सोहळ्याचे अध्यक्ष अशोक सावंत तसेच विविध दिंडी प्रमुखांनी गतवर्षी प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांनी वारकऱ्यांसाठी केलेल्या नियोजनाचे सादरीकरण केले.
