Ashok Chavan On Asha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं आज (१२ एप्रिल २०२६) निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांतील गाणी गायली आहेत. आशा भोसले यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्याबाबत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘आशाताईंची नांदेड भेटीची इच्छा अपूर्णच राहिली’, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी आशा भोसले यांच्या काही आठवणी सांगत त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

अशोक चव्हाण यांनी काय म्हटलं?

“आशाताईंची नांदेड भेटीची इच्छा अपूर्णच राहिली!”, असं म्हणत अशोक चव्हाण म्हणाले की, “आशाताई भोसले केवळ एक अद्वितीय गायिका नव्हत्या, तर त्या तितक्याच उत्तुंग व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांच्या जाण्याने आज त्यांच्या अनेक आठवणी दाटून येत आहेत. कोरोना काळानंतरचा तो दिवस मला आजही आठवतो. आमचे स्नेही प्रसाद महाडकर यांचा फोन आला. ते म्हणाले, आशाताई बोलणार आहेत आणि दुसऱ्या क्षणी आशाताईंचा आवाज कानी पडला. ख्यालीखुशाली विचारल्यानंतर त्या म्हणाल्या,’मला नांदेडला यायचं आहे, गुरुद्वारात दर्शन घ्यायचं आहे. आपण तो कार्यक्रम लवकरच ठरवूया.’ मी आनंदाने त्यांना होकार दिला आणि त्यांच्या सोयीची तारीख कळवण्याची विनंती केली. पण नियतीला कदाचित ते मान्य नव्हतं. दुर्दैवाने तो योग जुळून आला नाही. ९० च्या दशकात त्या एकदा नांदेडला आल्या होत्या. मात्र, त्यानंतर नांदेडला पुन्हा भेट देण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली, याची सल आज मनाला जाणवतेय”, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

“आशाताईंशी संवाद साधण्याची संधी मला अनेकदा लाभली. कधी प्रत्यक्ष भेटीतून, तर कधी फोनवरील संभाषणातून त्यांचं मोठेपण अनुभवायला मिळालं. एकदा गणेशोत्सवात त्या दर्शनासाठी घरी आल्या होत्या. त्यांची विनम्रता आणि आपुलकी त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढवणारी होती. नांदेडमध्ये दरवर्षी होणाऱ्या ‘संगीत शंकर दरबार’ कार्यक्रमासाठी देखील मी त्यांना विनंती केली होती. नांदेडकरांना त्यांचे जादुई सूर प्रत्यक्ष अनुभवता यावेत, अशी माझी मनापासून इच्छा होती. मात्र, त्यावेळी त्यांच्या प्रकृतीमुळे ते राहिलं आणि आता ती संधी कायमचीच हुकली. गायक म्हणून आशाताई भोसले अष्टपैलू होत्याच, पण माणूस म्हणूनही त्या तेवढ्याच ‘ग्रेट’ होत्या. आज त्या आपल्यात नाहीत, पण त्यांच्या गाण्यांच्या रूपाने त्या सर्वांच्या हृदयात सदैव जिवंत राहतील”, अशा भावना अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत.

‘आशाताईंचा आवाज थांबला असला, तरी त्यांचे सूर…’, शरद पवारांनी व्यक्त केल्या भावना

“आशाताईंच्या रूपाने भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला आहे. त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला आहे. त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतविश्वासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. आज त्यांचा आवाज थांबला असला, तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील. आशाताईंनी प्रत्येक भारतीय संगीतप्रेमींच्या मनात निर्माण केलेले अढळ स्थान कायम राहील. राष्ट्रीय पुरस्कार, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अशा असंख्य पुरस्कारांच्या मानकरी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा शब्दांत शरद पवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.