Nana Patole Ashish Deshmukh : “काँग्रेसमध्ये विजय भाऊ व नानाभाऊ या दोघांना आता केवळ खुर्चीची स्वप्नं पडत आहेत. आपण दोघं भाऊ भाऊ आणि एकमेकांना फाडून खाऊ अशी या दोघांची स्थिती आहे. विदर्भाच्या राजकारणात या दोघांमधील संघर्षाची चर्चा चालू आहे”, असं वक्तव्य भाजपा नेते आशिष देशमुख यांनी केलं आहे. देशमुख म्हणाले, “विदर्भासह महाराष्ट्र काँग्रेसमध्ये केवळ नाना पटोले व विजय वडेट्टीवार या दोघांमधील वादांची चर्चा होत आहे. दोघांचं एकमेकांशी अजिबात पटत नाही. तिकीट वाटपावरूनही दोघांमध्ये संघर्ष झाला आहे. त्याउलट भाजपाप्रणित महायुतीने राज्यातील जनतेला उत्तम सरकार दिलं आहे.” आशिष देशमुख हे पटोले आणि वडेट्टीवारांचे जुने सहकारी आहेत. पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून काँग्रेसने काही महिन्यांपूर्वी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर देशमुख भाजपात दाखल झाले. आता देशमुख यांनी त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशिष देशमुख म्हणाले, विजय वडेट्टीवार व नाना पटोले या दोघांना केवळ खुर्चीची स्वप्नं पडत आहेत. आपण दोघे भाऊ भाऊ आणि एकमेकांना फाडून खाऊ, अशी या दोघांची स्थिती आहे. या दोघांमधील मतभेदांची चर्चा विदर्भाच्या राजकारणात रंगत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दोघांमध्ये अजिबात पटत नाही. निवडणुकीच्या तिकिटांसाठी व वेगवेगळ्या जागांच्या वाटपावरून या दोघांनी एकमेकांना फाडून खाण्यापर्यंतची तयारी केली आहे. त्याउलट महायुती सरकार खऱ्या अर्थाने राज्यातील महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी काम करत आहे, त्यांना मदत करत आहे.

भाजपा नेते देशमुख म्हणाले, महायुती सरकारने राज्यातील महिलांना न्याय देण्याच्या दृष्टीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणली आहे. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटी रुपयांची मदत केली. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला वीजमाफी देण्याचा निर्णय घेतला. महायुती सरकारने मोठा भाऊ म्हणून जनतेसाठी कामं केली आहेत. जनतेच्या मदतीला धावून गेले आहेत. भाजपाप्रणित महायुतीने महाराष्ट्राला लोकाभिमुख सरकार दिलं आहे. त्याउलट काँग्रेसमध्ये गंभीर परिस्थिती आहे. विजय भाऊ व नाना भाऊ एकमेकांना फाडून खाऊ असे वागत आहेत.

हे ही वाचा >> “मुख्यमंत्री शिंदे मौलवीच्या वेशामध्ये दिल्लीला जायचे”, खासदार संजय राऊतांचा दावा

अनिल देशमुखांवरही टीका

दरम्यान, आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार अनिल देशमुखांवरही टीका केली होती. अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. तसेच त्यांच्याकडे पुरावे असलेला पेन ड्राईव्ह असल्याचा दावा केला होता. त्यावर आशिष देशमुख म्हणाले होते, अनिल देशमुख हे सुरुवातीपासूनच फॅशनेबल नेते असून उगाच काही तरी आरोप करायचा म्हणून, तसेच नवा ट्रेंड म्हणून पेन ड्राइव्ह दाखवत आहेत. परंतु, त्यात काहीच नाही. त्या पेन ड्राइव्हमध्ये काही असेल तर ते त्यांनी जनतेला दाखवावं अन्यथा त्यांची ओळख ही केवळ फॅशनेबल नेता म्हणून जनतेसमोर येईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish deshmukh claims conflict between nana patole vijay wadettiwar asc
Show comments