कराड: ध्येयनिश्चिती केल्यावर थांबू नका, ते गाठण्यासाठी वेळप्रसंगी अवघड वाटा चोखाळा, ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन अथक परिश्रम घ्या, असे आवाहन विश्वविक्रमवीर अल्ट्रा रनर आशिष कासोदेकर यांनी केले. आपण अपयश आल्यावर ते स्वीकारत चुका काय झाल्या, याचे आत्मचिंतन केले आणि त्यावर मात करण्याची तयारी केल्यानेच यश मिळाल्याचे कासोदेकर यांनी सांगितले.

‘रोटरी क्लब’तर्फे कराड रोटरी ॲवॉर्ड वितरण कार्यक्रम संपन्न झाला. त्यात ते बोलत होते. कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, ‘रोटरी’चे सहायक प्रांतपाल राजीव रावळ, कराड शाखाध्यक्ष रामचंद्र लाखोले, सचिव आनंदा थोरात, अभय नांगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. विश्वविक्रमवीर अल्ट्रा रनर आशिष कासोदेकर यांचा विशेष गौरव या प्रसंगी करण्यात आला. रोटरी क्लब कराड शाखेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानितही करण्यात आले.

आशिष कासोदेकर म्हणाले, ‘प्रत्येकाच्या आयुष्यात, खेळात चढ-उतार येतातच. अडचणीत कोणाची सहानुभूती स्वीकारू नका. सहानुभूतीमुळे माणूस दुबळा बनतो. अपयश आल्यावर कोणाच्या तरी माथी दोष मारणे सोपे असते. मात्र, अपयश आल्यावर ते स्वीकारून स्वतःचे काय चुकले याचे आत्मचिंतन करून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागा.’

डॉ. सुभाष एरम म्हणाले, ‘आता जग बदलले असून, आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत.’ आशिष कासोदेकर यांच्यापासून प्रेरणा घेत ध्येय प्राप्तीसाठी युवावर्गाने स्वतःला झोकून दिले पाहिजे. रोटरी क्लब कराड शाखेने सामाजिक कार्याचा एक वेगळा आदर्श निर्माण केला असून, त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.’

विश्वविक्रमी धावपटूने उलगडला जीवनपट

आशिष कासोदेकर आपला जीवनपट उलगडून सांगताना म्हणाले, ‘लंडनमधील १ हजार ४०० किलोमीटर सायकलिंग स्पर्धा, केरळ ते लडाख दरम्यान ४ हजार किलोमीटरची हाय अल्ट्रा रन, सलग ६० दिवसांत ६० मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करत बनविलेले गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, जगातील सर्वांत कठीण असणारी ‘ला अल्ट्रा’ ५५५ किलोमीटरची १२६ तासांत पूर्ण केलेली हिमालयातील मॅरेथॉन, एव्हरेस्ट ६० किलोमीटर मॅरेथॉन अशा वेगवेगळ्या स्पर्धांची तयारी, स्पर्धेतील अनुभवासह कासोदेकर यांनी आपला जीवनपट कराडकरांसमोर समोर उलगडला.

उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देत कासोदेकर यांनी आपण सकाळी उठल्यावर आनंद घेत जगायचे, की जीवनातील आनंद सोडून जगायचे, हे ठरविणे आवश्यक असल्याचे सांगितले. खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शनही केले.