शिवसेना आणि भाजपा यांच्यातल्या तुटलेल्या युतीची गेल्या अडीच वर्षांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. या मुद्द्यावरून हे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी बाळासाहेबांचा संदर्भ देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात बोलताना आशिष शेलार यांनी शिवसेनेवर परखड शब्दांत टीकास्त्र सोडलं. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आशिष शेलार यांनी बाळासाहेबांच्या काळात घडलेला एक किस्सा देखील सांगितला.

पहिली शिवसेना आणि आत्ताची शिवसेना!

यावेळी युतीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आशिष शेलार यांनी शिवसेनेची दोन रुपं असल्याचं सांगितलं. “शिवसेनेची दोन रुपं या काळातली दिसतात. पहिलं बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि दुसरं आत्ताची शिवसेना. ही दोन्ही रुपं वेगवेगळी आहेत.पहिल्या शिवसेनेसोबत काम करण्याचा आम्हाला आनंद, उपयोग आणि त्यातून सहकार्याचं बळ दोन्ही पक्षांना मिळालं. बाळासाहेब वडीलधारी व्यक्ती असल्यामुळे बऱ्याच प्रकरणात त्यांचंच ऐकलं गेलं. पण दुसऱ्यांचं ऐकयाचचंच नाही, अशी भूमिका मात्र त्यांनी कधी घेतली नाही”, असं शेलार म्हणाले.

“…हे आम्ही खपवून घेणार नाही”

“आमचं कुणीही शत्रू नाही. ते आमचे विरोधक आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना किंवा कुणीही. दुर्दैव हे आहे की आमच्यासोबत सत्तेच्या सर्व पायऱ्या चढून, आमच्यामुळे शिवसेनेने स्वत:च्या पक्षाचा विस्तार करूनही आज आमच्याविरोधात टोकाचं आणि नेतृत्वाविरोधात टोकाचं बोललं जातं. हे आम्ही खपवून घेणार नाही”, असं देखील आशिष शेलार यावेळी म्हणाले.

“२०१७मध्येच राष्ट्रवादीसोबत युतीची बोलणी झाली होती, मंत्रीपदंही ठरली, पण…”; आशिष शेलार यांचा मोठा गौप्यस्फोट!

विधानपरिषदेच्या ‘त्या’ निवडणुकीवरून वाद!

दरम्यान, यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी मुंबईतील विधानपरिषद जागेबाबत घडलेला किस्सा सांगितला. “जेव्हा विधानपरिषदेच्या मुंबईतून निवडून येणाऱ्या जागेवरून वितुष्ट निर्माण झालं तेव्हा शिवसेनेचं संख्याबळ जास्त होतं. न्यायिकपणे शिवसेनेचा दोन्ही जागांवर दावा होता. आम्ही बाळासाहेबांना विनंती केली की दुसरी जागा तुम्ही आम्हाला दिली तर आमचं स्थान बळकट होईल. नंदू साटम स्वत: कलेक्टर ऑफिसवर अर्ज दाखल करायला पोहोचले होते. त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी भाजपासोबत केलेल्या युतीच्या एका शब्दासाठी मागे बोलावलं आणि भाजपाचा विधानपरिषदेवर सदस्य झाला. त्यामुळे देवाण-घेवाणीच्या मुद्द्यावर बाळासाहेबांनी वडिलधारी व्यक्ती म्हणून भूमिका निभावली. हिणवणं, डिवचणं, कळ काढणं असं त्यांनी केलं नाही. म्हणून त्या संसारात आम्ही दोघं खूश होतो. नेतृत्व बदललं तेव्हा कुचकेपणा, तुसडेपणा याचा सर्वस्वी अनुभव प्रमोद महाजन यांच्याच काळात सुरू झाला. हळूहळू त्यांनी टोक गाठलं”, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.

“बाळासाहेबांनंतर शिवसेनेसोबत राहाणं आनंदी नव्हतं. जुन्या मैत्रीच्या आधारावर उद्याची अपेक्षा करणं स्वाभाविक असतं. पण बाळासाहेबांएवढा आनंद उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीमुळे मिळाला नाही”, असं देखील शेलार म्हणाले.