मुंबई : महापालिकेची निविदा प्रक्रिया मानवी हस्तक्षेप शुन्य होऊन अधिकाधिक पारदर्शक होण्याकरिता आणि कामांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, याकरिता एआयचा वापर करण्याची सूचना मुंबई उपनगर पालकमंत्री आणि इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमता विभागाचे मंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना केली.
राज्याच्या एआय धोरणाला अनुसरून काम व्हावे याकरिता शेलार यांनी पालिका आयुक्त आणि विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीला पालिका आयुक्त अश्विनी भिडे, महाआयटीचे संचालक संजय काटकर, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालिका भूवनेश्वरी यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दैनंदिन कामकाजात म्हणजे नालेसफाईमध्ये, नागरी सेवांमध्ये पारदर्शक व गतीमानता यावी पालिका एआयचा वापर कशा पध्दतीने करते आहे, याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या यंत्रणेत एआयच्या मदतीने आणखी सुधारणा करण्याची सूचना शेलार यांनी केली.
नागरिकांच्या तक्रारी चॅटबॉटमार्फत विभाग कार्यालयात संकलित करण्यात येतात. एआयच्या मदतीने कोणत्याही महापालिका कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीचे चित्रिकरण संबंधित विभागकडे जाईल व त्यावर कारवाई तातडीने कारवाई होण्याच्या दृष्टीने नियोजन करा, असे शेलार यांनी सुचविले.
शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होणाऱ्या ई फाईल व ई स्वाक्षरीच्या संकल्पनेचे उदाहरण दिले. ही संकल्पना पालिकेतही राबवून पेपरलेस कारभार होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली.
पारदर्शकतेसाठी सूचना
महापालिकेच्या निविदेत अनेकदा बदल केले जातात. त्यावर एआय नियंत्रण आणणे. जेणेकरून नागरिकांना अशा पध्दतीने झालेल्या कामांची माहिती मिळू शकेल आणि झालेले बदल योग्य आहेत की नाहीत हे स्पष्ट होईल. महापालिकेच्या कामकाजातील नागरिकांचा, तरूणांचा सहभाग वाढावा याकरिता तरुणांची हॅकेथॉन आयोजित करा.
