मुंबई: पं. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या अन्यायी, अत्याचारी आणि लांगुलचालनाच्या राजकारणामुळे तृणमुल काँग्रेस पक्षाचा तंबू उखाडला गेला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि सांस्कृतिक मंत्री अॅड आशिष शेलार यांनी भाजपने पं. बंगालसह तीन राज्यांत मिळविलेल्या यशावर भाष्य करताना व्यक्त केली. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास दर्शवत भाजपला राज्याच्या निवडणुकांमध्ये अभुतपूर्व यश मिळवून दिले आहे. तसेच, महाराष्ट्रातील पोट निवडणुकांमध्ये महायुतीने यश मिळविले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

एसआयआरचा भाजपच्या विजयाला हातभार लागला का, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, सकाळी सूर्य, संध्याकाळी चंद्र उगविल्याचे, रात्रीचे तारे लुकलुकल्याचे ज्यांना दिसत नाही, त्यांच्या डोळ्यांवर पट्टी आहे. त्यांना अंधारच दिसणार. त्यांच्याविषयी काहीच बोलता येत नाही. पं बंगालच्या यशात एसआयआरचा हात आहे, असे विरोधक म्हणत असतील तर केरळचे काय, असा प्रश्न शेलार यांनी केला. विरोधक रडवे आणि डरपोक आहेत. ते सत्याला सामोरे जाऊ शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले.

आसाममध्ये लोकांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर विश्वास दाखवत अभुतपूर्व असे यश मिळवून दिले आहे. तर पाँडेचरीमध्येही भाजप पुन्हा सरकार स्थापन करणार आहे. भाजपच्या यशापुढे विरोधक नामोहरम झाले आहेत. केरळमध्येही भाजपच्या मतांमध्ये आणि जागांमध्ये स्पष्ट वाढ झालेली आहे. स्टालिन यांना लोकांनी नाकारले आहे. याचा अर्थ जे जनतेच्या हितात काम करत नाहीत, त्यांना लोक नाकारतात, हे तामिळनाडूच्या निकालांवरून दिसून येते, अशा शब्दात त्यांनी तामिळनाडूतील स्टालिन यांच्या पराभवावर टिपण्णी केली.

जो जो शिवसेना ठाकरे सेनेसोबत गेला, तो तो हरला. त्यांचे राजनैतिक पानिपत झाले. तामिळनाडूत शिवसेना ठाकरे सेनेवाले स्टालिन आणि बंगालमध्ये ममता बॅनर्जींसोबत सलगी करत होते. त्यांचा सगळ्यांचा पराभव झाला, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सेनेला लक्ष्य केले.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर हिंदुस्तानने पुन्हा एकदा विश्वास दाखविला. अमित शहा, नितिन नबीन आणि राज्यातील विजयाकरिता प्रयत्न करणाऱ्या नेत्यांमुळे या राज्यांमध्ये भाजपचा विजय झाला आहे. विशेषत प. बंगाल आणि केरळमध्ये प्रतिकूल परिस्थितीत जीवावर उदार होत कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम केले. बलिदान दिले. त्या कार्यकर्त्यांचे आणि त्यांच्या परिवारांचे आपण धन्यवाद मानतो, असे शेलार यावेळी म्हणाले.