ड्रग्ज प्रकरणावरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान सुरू असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केली होती. या मुद्द्याला धरून भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी नवाब मलिक आणि उद्धव ठाकरे या दोघांवर टीका केली आहे. “जर राज्याची बदनामी होऊ नये असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर ज्याचा जावई गंजेडी म्हणून पकडला गेला, तो मंत्री लाथ मारून मुख्यमंत्र्यांनी हाकलला पाहिजे. राज्याची बदनामी अशा मंत्र्यांमुळे होते”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत. राजभवनवर राज्यपालांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.

“काम करुँगा नहीं और करने दूँगा नहीं”

“दारू आणि गुत्त्याच्या वसूलीत अधिकारी लावले जातात. त्यानंतर अधिकारी पोपटपंचीसारखं बोलतात. यातून राज्याची बदनामी होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आठवण करून देऊ इच्छितो, की देशाप्रमाणेच राज्यातही कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य अपेक्षित आहे. पण राज्य सरकारचा नारा वेगळा दिसतोय. ‘काम करुँगा नही और करने दूँगा नहीं’. स्वत: काम करायचं नाही आणि कुठल्या यंत्रणांना काम करून द्यायचं नाही”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

..असा ताठ बाणा तुमच्याकडून अपेक्षित

“एक मंत्री सकाळ-संध्याकाळ उठून कुठलातरी तंबाखू घेतल्यासारखं बोलतोय. मंत्रीमहोदयांनी शपथ कशाची घेतलीये, ते करतायत काय? कायदेशीर काम करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात रोज तुम्ही बोलतायत. बाकीचे पक्ष कान-नाक-डोळे बंद ठेवून बसलेत. मोहीत भारतीय यांनी केलेल्या आरोपांवर चौकशी व्हायला हवी. नाहीतर मोहीत भारतीय स्वत:च मंत्रीमंडळातील ते नाव घोषित करतील. त्या मंत्र्याला नारळ देऊन घरी पाठवण्याचा ताठ बाणा उद्धवजी तुमच्याकडून अपेक्षित आहे”, असं आशिष शेलार यावेळी म्हणाले. राज्यातील एक मंत्री क्रूज पार्टी प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप मोहीत भारतीय यांनी केला आहे.

“सामनाचा अग्रलेख म्हणजे वैचारिक दारिद्र्य”

दरम्यान, ‘सामना’च्या अग्रलेखात आज मांडण्यात आलेली भूमिका म्हणजे वैचारिक दिवाळखोरी असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे. “सामनाचा आजचा अग्रलेख म्हणजे शिवसेनेच्या वैचारिक दारिद्र्याचं प्रदर्शन आहे. त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. दिवाळी तोंडावर आहे. दिवाळीत आपण सगळेच घराचा उडालेला रंग पुन्हा आणण्याचा प्रयत्न आपण करत असतो. शिवसेनेचा भगवा रंग उडालेला आहे. त्याला पुन्हा एक पेंट लावण्याचा वायफळ प्रकार या अग्रलेखात आहे”, असं ते म्हणाले.