मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील महानगरपालिका क्षेत्रातील नाट्यगृहांच्या भाड्यामध्ये दरवर्षी करण्यात येणारी ५ टक्क्याची भाडेवाढ आता केवळ १ ते २ टक्के भाडेवाढ करण्याबाबत फेरविचार करण्यात येईल. भाडेवाढीचा आधार हा कोविडपूर्वीचा मूळ दरच मानण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मराठी नाट्यसृष्टीच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोडाऊन व वाहनतळाच्या प्रश्नावर महिनाभरात व्यवहार्य पर्याय सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मंत्रालयात झालेल्या या भाडेवाढीच्या संर्धभात एक बैठक झाली. महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांनी नाट्यगृहांच्या वीज, देखभाल व दुरुस्तीवरील वाढत्या खर्चामुळे भाडेवाढ आवश्यक असल्याची भूमिका मांडली.

शेलार यांनी मराठी नाट्यसृष्टीचे हित आणि महानगरपालिकांची आर्थिक शाश्वतता यांचा समतोल राखण्याचे निर्देश दिले. त्यानुसार भाडेवाढीचा आधार कोविडपूर्वीचा मूळ दर ठेवण्यात येणार आहे, दरवर्षांनी ५ टक्के भाडेवाढ करण्याऐवजी दरवर्षी केवळ १ ते २ टक्के भाडेवाढ करण्याच्या प्रस्तावावर संबंधित महानगरपालिका व स्थायी समित्यांनी फेरविचार करावा, असे निर्देश शेलाप यांनी दिले. सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, अभिनेते प्रशांत दामले, निर्माते प्रसाद मच्छिंद्र कांबळी तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे प्रतिनिधी, विविध महानगरपालिकांचे अधिकारी उपस्थित होते.