ब्रिटनमधल्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातील वाघनखे भारतात आणण्यासाठी मंगळवारी, ३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र सरकार सामंजस्य करार करणार आहे. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांची होती, असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या वाघनखांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी वाघनखांवरून काही प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांवर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं, तसेच आदित्य ठाकरे यांच्यावर टीकादेखील केली आहे.
ही वाघनखं शिवकालीन आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाखनखं आहेत? तसेच ही वाघनखं कायमस्वरुपी आणत आहोत की, ठराविक वर्षांसाठी आणली जात आहेत? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.
यावर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आशिष शेलार यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी शेलार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात अफझल खानाचा कोथळा काढणारी वाघनखं भारतात येत आहेत. परंतु, हे पाहून काही लोकांच्या पोटात दुखू लागलं आहे. पेंग्विन कुटुंबाला त्रास होऊ लागला आहे.
हे ही वाचा >> “तुम्ही मराठ्यांना डिवचल्यावर…”, मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना इशारा
आशिष शेलार म्हणाले, वाघनखं महाराष्ट्रात येत आहेत म्हटल्यावर हे नकली वाघ काहीही वक्तव्ये करू लागले आहेत. पुरावे मागू लागले आहेत. विशेषतः उबाठा गटातील लोक छत्रपतींच्या इतिहासाबद्दल प्रश्न निर्माण करू लागले आहेत. उबाठाच्या मनात नेमकं काय आहे? आदित्य ठाकरे आपल्या शौर्याच्या प्रतीकांवर वक्तव्ये करत आहेत. म्हणून हे सगळे नकली वाघ थयथयाट करू लागले आहेत. आमचा आदित्य ठाकरे यांना प्रेमाचा सल्ला आहे की, पेग, पेंग्विन आणि पार्टी हा तुमचा विषय आहे. पबमधले विषय आणि त्यातला थयथयाट रस्त्यावर करायचा नसतो.