काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर आता 'सामना' या शिवसेनेच्या मूखपत्राद्वारे शिवसेनेच्या ठाकरे गटाने मोदी सरकारवर टीकेचे बाण चालवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, देशात अमृतकाल सुरू आहे, परंतु या अमृत काळात रोज विषाचे फवारे उडताना दिसत आहेत. राहुल गांधी चोरांना चोर म्हणाले यात त्यांचा काय गुन्हा आहे? असा सवाल सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला आरहे. दरम्यान, सामनाच्या या अग्रलेखावर भाजपाकडून प्रतिक्रया येऊ लागल्या आहे. भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी सामनाच्या अग्रलेखावर टीका केली आहे. आशिष शेलार म्हणाले की, "ज्या बौद्धिक पातळीवरून त्यांचे अग्रलेख येत आहेत. अशा प्रकारच्या अग्रलेखांबद्दल बोलताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सांगितलं होतं की, गांजा किंवा चिलीम ओढलेला माणूस किंवा वेड लागलेला माणूस अशा पद्धतीने लिहू शकतो. मीसुद्धा सामनाचा अग्रलेख लिहिणाऱ्या माणसाची तुलना गांजा आणि चिलीम ओढणाऱ्या माणसासोबतच करेन." "गांजा किंवा चिलीम ओढलेल्या माणसाने लिहिलेला अग्रलेख लिहिला आहे, असं वर्णन मी सामनाच्या अग्रलेखाचं करेन, यापेक्षा जास्त काही मी बोलणार नाही", असं शेलार म्हणाले. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत ये 'सामना'चे कार्यकारी संपादक आहेत. तेच सामनासाठी बहुतांश वेळा राजकीय अग्रलेख लिहितात. त्यामुळे शेलारांनी थेट राऊतांना टोला लगावला आहे. हे ही वाचा >> ‘जोडे मारो’ आंदोलकांवर कारवाई नाहीच; विरोधी पक्षांचा सभात्याग, अजित पवार म्हणाले, “अध्यक्षांचा कल…” शिवसेनेने अग्रलेखात काय म्हटलंय? राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा भ्याडपणा या मोदी सरकारने केला आहे. चोरांना चोर म्हणण्याचे धाडस राहुल गांधी यांनी दाखवलं, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी कायदेशीर कारवाईची मर्दुमकी दाखवली आहे. सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न राहुल गांधी यांनी कर्नाटकातल्या एका प्रचारसभेत विचारला होता. या प्रश्नामुळे ‘मोदीनामा’ची मानहानी झाली असे ठरवून गुजरातमधले एक वेगळेच मोदी सुरत न्यायालयात गेले. सुरतच्या न्यायालयाने या खटल्यात राहुल गांधी यांना दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधींना न्यायालयाने माफी मागून हे प्रकरण मिटवा असा पर्याय दिला आहे. परंतु राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही आणि जामिनावर मुक्त होऊन सुरत न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्याचा पर्याय स्वीकारला.