नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी शांत होते न होते तोच विधानसभा निवडणुकांच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. या विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या विधानपरिषद निवडणुकांमध्येही महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडी यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगल्याचं दिसून आलं. राज्यातील शिक्षक व पदवीधर अशा चार मतदारसंघांमध्ये मंगळवारी २६ जून रोजी मतदान पार पडलं. यामध्ये आता सज्ञ पदवीधर आणि पुढच्या पिढीला सुज्ञ करणारे शिक्षक कुणाच्या पारड्यात मत टाकतात, याची उत्सुकता सध्या सगळ्यांनाच लागली आहे.
नाशिक व कोकणप्रमाणेच मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघात दोन्ही बाजूच्या उमेदवारांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. मात्र, या निवडणुकीसंदर्भात आता महायुतीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे गटावर गंभीर आरोप करत त्यांनी पैशांचं वाटप झाल्याचं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावरून आता ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर येण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले आशिष शेलार?
आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनात आज पहिल्या दिवसाचं कामकाज अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल मांडल्यानंतर तहकूब करण्यात आलं. त्यानंतर विधिमंडळ आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल केला. तसेच, मतदार भाजपा उमेदवारांवर विश्वास दर्शवतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
चंद्रकांत पाटलांनी विधान भवनात घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण
“काल विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका झाल्या. दोन्ही निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. पण याचा जाणुनबुजून उल्लेख करावा लागेल की उबाठा सेनेने काल पैशांचा धुमाकूळ घातला होता”, असा आरोप आशिष शेलार यांनी यावेळी केला.
“शिक्षकांमधून उमेदवार असेलेल अभ्यंकर भयंकर असल्याप्रमाणे त्यांचे कार्यकर्ते पैसे वाटत होते. तर दुसरीकडे पदवीधर मतदारसंघातून उबाठाचे उमेदवार असणारे परब अरब असल्याप्रमाणे त्यांचे लोक पैसे वाटण्याचं काम करत होते. त्यामुळेच पैशाच्या जोरावर मतदारांना विकत घेता येतं असं मानून पैशांचा धुमाकूळ उबाठा सेनेने घातला. काही अन्य उमेदवारांनीही त्यांना साथ दिली. पण भाजपाचे दोन्ही उमेदवार किरण शेलार आणि शिवनाथ दराडे यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी संघटनेची पूर्ण ताकद लावली. माझा मतदारांवर विश्वास आहे. आमचा विजय मतदार सुकर करतील असा माझा दावा आहे”, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला.