रत्नागिरी :  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी समर्पित होते. त्यांच्या जीवनातील ‘राष्ट्राय स्वाहा’ ही त्याग, समर्पण आणि राष्ट्रनिष्ठेची भावना आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक ठरणारी आहे. सावरकरांच्या विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

रत्नागिरी येथे सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि खल्वायन निर्मित ‘विश्वभूषण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर : क्रांतीची धगधगती ज्वाला’ या संगीत-नृत्य-नाट्यमय कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आमदार प्रमोद जठार, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, प्रशांत यादव, कार्यक्रमाचे लेखक श्रीकृष्ण जोशी, खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी, अभिनेते सुशांत शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

सावरकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना शेलार म्हणाले, “सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर ते प्रतिभावान लेखक, कवी, नाटककार आणि मराठी-हिंदी साहित्य समृद्ध करणारे शब्दशिल्पी होते. काळ्या पाण्याची अमानुष शिक्षा भोगतानाही त्यांनी स्वाभिमानाशी कधीही तडजोड केली नाही. त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा नव्या पिढीने अभिमानाने पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”

लोककला आणि लोककलावंतांच्या संवर्धनासाठी शासनाने १० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान उपलब्ध करून दिले असल्याची माहिती देत शेलार म्हणाले की, महाराष्ट्राची समृद्ध कला आणि संस्कृती ही राज्याची खरी ‘सॉफ्ट पॉवर’ असून ती जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांस्कृतिक विभागाची जबाबदारी दिल्यानंतर राज्याची सांस्कृतिक परंपरा घराघरांत पोहोचवण्याचा संकल्प केला असून, वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल १,२०० सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिरगाव येथील मोरेश्वर दामले यांच्या निवासस्थानी स्वातंत्र्यवीर सावरकर वास्तव्यास होते, या ऐतिहासिक संदर्भावर त्यांचे नातू रविंद्र दामले यांनी लिहिलेल्या पुस्तकाची प्रत मंत्री शेलार यांना भेट देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला रसिक, नागरिक आणि सावरकरप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.