मुंबई : भावनांमधील ओलावा सच्चा असेल तर मग शब्द कुठल्याही भाषेत असो, त्यांना सीमेचे बंधन राहत नाही… असाच काहिसा अनुभव महाराष्ट्राने मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरवासीयांना दिला. राज्याचे सांस्कृतिक मंत्री अॅड आशिष शेलार यांनी सोमवारी प्रख्यात उर्दू शायर आणि पद्मश्री डॉ. बशीर बद्र यांच्या भोपाळमधील जहांगीराबाद येथील निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. बद्र यांचे २८ मे रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले.

बद्र यांच्या निधनाचे वृत्त आले, तेव्हा शेलार कुटुंबियांसमवेत बाहेर गेले होते. बातमी समजताच, त्यांनी सोमवारी भोपाळमधील ‘बशीर मंज़िल’ बद्र यांचे निवासस्थान गाठले. बशीर यांच्या पत्नी राहत, मुलगा तय्यब यांची भेट घेऊन त्यांनी बद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला.

बद्र यांच्या पत्नी राहत या देखील उर्दुच्या अभ्यासक आहेत. तर मुलगा तय्यब माजी आयआयटीयन आहेत. पर्यावरण या विषयात काम करतानाच जाहिर कार्यक्रमातून वडिलांचा शायरीचा ठेवा ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत.

बद्र यांच्या साहित्यातून सूफी विचार डोकावतो. परंतु, त्यांनी कधीच स्वतला विचारांच्या सीमेत अडकवून घेतले नव्हते. त्यांना अनेक कटू अनुभव आले. त्यांची लेखणी जाळण्यात आली. परंतु, त्यांनी याविषयी कधी कटुता बाळगली नाही, असे शेलार यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.