नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्यालय नांदेडमध्ये, या बँकेतील औटघटकेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूकही नांदेडमध्येच; पण त्यासाठीच्या हालचाली आणि घडामोडी मात्र मुंबईतल्या तारांकित रुग्णालयातील एका सुसज्ज दालनामध्ये झाल्याचे समोर आले आहे.
वरील बँकेचे एक संचालक आणि उपाध्यक्ष हरिहर विश्वनाथराव भोसीकर यांचे सुमारे दोन महिन्यांपूर्वी निधन झाल्यामुळे दोन्ही रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक प्राधिकरणाकडून येत्या २१ आणि २२ जुलै रोजी दोन स्वतंत्र बैठका निश्चित झाल्याबरोबर काही विद्यमान संचालकांची उपाध्यक्ष पदासाठी मोहीम सुरू झाली असून, त्यासाठी चर्चांचे केंद्र मुंबईतील एक मोठे रुग्णालय असल्याचे दिसून आले.
बँकेचे अध्यक्ष भास्करराव खतगावकर हे मागील तीन आठवड्यांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार आणि विश्रांती घेत असून, यादरम्यान बँकेतील दोन्ही रिक्त पदांच्या निवडीसाठी संचालक मंडळाच्या बैठकांची सूचना (नोटीस) जारी झाल्यानंतर खा. अशोक चव्हाण, खा. रवींद्र चव्हाण, जिल्ह्यातले एक आमदार आणि बँकेचे काही संचालक खतगावकर यांना रुग्णालयातील त्यांच्या खोलीलगतच्या स्वतंत्र दालनात भेटून आले. प्रकृतीची विचारपूस आणि बँकेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक हे दोन्ही विषय चर्चेमध्ये होते.
भोसीकर हे लिंगायत वाणी समाजातील कृतिशील नेते होते. बँकेच्या संचालक मंडळावर ते इतर मागासवर्ग मतदारसंघातून निवडून आले. त्यांच्या संचालकपदाच्या रिक्त जागेवर त्यांचे पुत्र शिवकुमार यांना संधी द्या, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडूनच आली असून, त्याप्रमाणे शिवकुमार यांची निवड जवळपास निश्चित समजली जात आहे. त्यांनी खतगावकर यांच्यासह ‘राष्ट्रवादी’च्या जिल्ह्यातील एकमेव आमदारांचीही भेट घेऊन त्यांना विनंती केली. त्यांच्या नावाला अन्य संचालकांचाही विरोध नाही. तसेच या स्पर्धेत दुसरे नावही समोर आलेले नाही.
बँकेच्या संचालक मंडळाची आता तीन गटांत विभागणी झाली आहे. एक गट आहे, खा. अशोक चव्हाण यांचा. दुसरा काँग्रेसचा, त्याचे नेतृत्व खा. रवींद्र चव्हाणांकडे तर तिसरा गट आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाचा. येथे मिळालेल्या माहितीनुसार खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या गटाच्या संचालकांशी मुंबईमध्ये चर्चा करून त्यांचे म्हणणे जाणून घेतले. या चर्चेप्रसंगी किनवटचे संचालक माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे हजर होते.
खासदार रवींद्र चव्हाण आणि उपाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले हनमंतराव बेटमोगरेकर यांनीही खतगावकर यांची मुंबईमध्ये भेट घेतली. बेटमोगरेकर यांच्यासाठी बरेच प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी बँकेचे ज्येष्ठ संचालक मोहन पाटील टाकळीकर यांचीही भेट घेतली. काँग्रेस वगळता अन्य गटांमधील उपाध्यक्षपदाच्या इच्छुकांची नावे समोर आली नसली, तरी उपाध्यक्षपद आपल्या भोकर मतदारसंघात पळविण्याची खा. अशोक चव्हाण यांची योजना असल्याचे दिसत आहे. महायुतीशी संबंधित संचालकांतूनच उपाध्यक्ष व्हायला हवा, असा चव्हाण गटाचा आग्रह आहे. खतगावकर आणि खा. अशोक चव्हाण पुढील आठवड्यात नांदेडमध्ये आहेत. त्यानंतर बँकेच्या उपाध्यक्षपदासंबंधी चर्चा आणि हालचाली सुरू होतील. यानिमित्ताने खासदार चव्हाण आणि आमदार चिखलीकर एकत्र येणार का, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
बँकेचे अध्यक्षपद मागील अनेक वर्षांपासून मराठा समाजाकडे असल्यामुळे उपाध्यक्षपद अन्य प्रवर्गातील संचालकांकडे सोपवावे, असा एक मतप्रवाह आहे. भोसीकर हे लिंगायत समाजाचे होते. त्यांचा मुलगा संचालक झालाच, तर उर्वरित सहा-सात महिन्यांसाठी त्यालाच उपाध्यक्ष करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून समोर येत आहे.