भाजपमध्ये २४२ जणांचा प्रवेश

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना भाजपच्या नेत्यांनी पुन्हा धक्का देत भोकर नगरपरिषद अल्पमतात आणली आहे. या घटनांना अलीकडेच वेग आला. विशेष म्हणजे  मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांची महाजनादेश यात्राही  शुक्रवारी सायंकाळी नांदेड जिल्ह्यात दाखल झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांच्या भाजप प्रवेशाद्वारे त्या पक्षाला खिंडार पडले, तर दुसरीकडे  खासदार प्रताप चिखलीकर यांनी भोकर नगरपरिषदेत काँग्रेसला अल्पमतात आणले.

लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपने चिखलीकर यांच्या माध्यमातून पराभूत केल्यानंतर पक्षाच्या जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री पहिल्यांदा नांदेडमध्ये आले असून त्यांनी शुक्रवारी येथे मुक्काम ठोकला. नांदेड शहरात दाखल होण्यापूर्वी अर्धापूरजवळील शनिपार्डी येथे २१ तोफांच्या सलामीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.

मागील काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे काही दिग्गज नेते भाजपमध्ये दाखल झाले. काँग्रेसचे माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी २०१४  मध्ये भाजप प्रवेशाची सुरुवात करून नंतर जिल्ह्यात पक्षाचा चांगला विस्तार केला. त्यानंतर भाजपकडून खासदार झालेल्या चिखलीकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात आणण्याचे सत्र आरंभिले असून गोरठेकरांच्या भाजप प्रवेशामुळे उमरी व धर्माबाद नगरपरिषदा आपोआप भाजपच्या ताब्यात गेल्या.

या दोन तालुक्यांसह भोकर, नायगाव आदी तालुक्यांतील नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती व बाजार समिती सदस्य, पक्ष पदाधिकारी अशा सुमारे २४२ जणांच्या भाजप प्रवेशाची यादी शुक्रवारी दुपारी तयार झाली. गेल्या पाच वर्षांत नांदेड जिल्ह्यातून भाजपतली ही सर्वात मोठी भरती असल्याचे मानले जात आहे.

गोरठेकरांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आतापर्यंतची सर्वात मोठी फूट, अशी नोंद जिल्ह्याच्या राजकीय पटावर झाली. पण भोकरमध्ये नगरपरिषदेत आतापर्यंत काँग्रेसने बहुमत राखले असताना ११ जणांतील पाचजणांना फोडून चिखलीकर-गोरठेकर यांनी काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांना धक्का दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत गोरठेकर भोकरमधून उभे राहण्यास इच्छुक आहेत.