बिहार राज्याच्या निवडणुका असल्याने सव्वालाख कोटीचे पॅकेज देण्यासाठी केंद्र शासनाकडे निधी आहे पण महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना केंद्र व राज्य शासन मदतीसाठी पुढे येत नाही, हे दुर्दैव आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांनी राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची वाट पहावी का? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी येथे गुरुवारी शेतकरी मेळाव्यात बोलताना उपस्थित केला.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७१ व्या जयंतीनिमित्त करवीर तालुक्यातील िदडनेर्ली येथील राजीव गांधी सूतगिरणीमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना खासदार चव्हाण यांनी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणावर टीका केली. शासनाला सामान्य जनतेच्या कोणत्याच प्रश्नाचे गांभीर्य नाही, असा उल्लेख करून चव्हाण म्हणाले, ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याने त्याला मदत करण्यासाठी केंद्र शासनाने सहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज साखर कारखान्यांना देण्याची घोषणा केली आहे. तथापि या पॅकेजमधील अवघे दोनशे पन्नास कोटी रुपये मिळणार असल्याने ते फसवे आहे. साखर कारखान्यांवर काँग्रेसचे वर्चस्व असल्याने ते मोडीत निघावे, अशी भाजपा सरकारची इच्छा आहे. पण या प्रयत्नात ते हे विसरतात की साखर कारखाने बंद पडले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागणार आहे. केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला असल्याने अच्छे दिन काँग्रेस पक्षच आणू शकेल, असा विश्वास व्यक्त करून चव्हाण यांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्तक राहण्याची गरज व्यक्त केली.
राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केंद्रातील सरकार हे गरीब शेतकऱ्यांचे राहिलेले नाही, अशी टीका केली. भूमिअधिग्रहण कायद्यातून शेतकऱ्यांना नामशेष करण्याचे धोरण शासनाने आखले आहे. शासन गरिबांचे नव्हे तर अदाणी, अंबाणी आणि लुटारूंचे आहे. सर्वसामान्यांचा अपमान करणाऱ्या या फसव्या सरकारच्या धोरणा विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार अशोक चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला. माजी मंत्री पतंगराव कदम, सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील, राहुल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.