Ashok Chavan : राज्यात लवकरच विधानसभेची निवडणूक जाहीर होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यादृष्टीने उमेदवारांची चाचपणीदेखील केली जात आहे. अशातच आता या निवडणुकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना भाजपाकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत आता अशोक चव्हाण यांनीदेखील भाष्य केलं आहे.

अशोक चव्हाण यांनी नुकताच एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, यांना मुलगी श्रीजया यांच्या उमेदवारीबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, तिची इच्छा असेल तर तिने उमेदवारीसाठी प्रयत्न करावे, मी यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – “अशोक चव्हाण आता पिंजऱ्यातील पोपट झालेत”, विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका

नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण?

“पक्ष जे ठरवेल त्यानुसार काम करण्याची आमची भूमिक आहे. माझ्या कुटुंबातून माझी मुलगी श्रीजया सामाजिक क्षेत्रात काम करते आहे. तसेच ती राजकीय क्षेत्रातही सक्रीय आहे. भाजपाच्या अनेक सभांना ती हजर असते. तिची जर इच्छा असेल, तर तिनं पक्षाकडे तिकीटाची मागणी करावी, पण मी तिच्या तिकिटासाठी प्रयत्न करणार नाही. तिनं स्वत: त्यासाठी प्रयत्न करावेत. मी तिच्याबरोबर असेन”, असं अशोक चव्हाण म्हणाले.

“तिने तिच्या भविष्याचा निर्णय घ्यावा”

“श्रीजयाने तिच्या स्वत:च्या भविष्याचा निर्णय घ्यावा, तिला कुठून तिकीट द्यावं, हा पक्षाचा विषय आहे. मी त्यात कुठेही हस्तक्षेप करणार नाही. ती मागच्या काही वर्षांपासून माझ्या मतदारसंघात काम करते आहे. तिने पडद्यामागून अनेक निवडणुकीत माझं काम केलं आहे. तिने वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ती सुशिक्षित आहे. तिची इच्छा असेल तर तिने निवडणूक लढावावी, एक वडील म्हणून तिने राजकारणात यावं, अशी माझी इच्छा आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – नांदेडमध्ये नेत्यांचे वारसदार रिंगणात

“नांदेड आणि हिंगोलीची जबाबदारी माझ्याकडे”

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने नेमकी काय जबाबदारी दिली आहे? असं विचारलं असता, “मी भाजपामध्ये आल्यानंतर किंवा काँग्रेसमध्ये असतानासुद्धा पक्षा कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. भाजपामध्येही मी कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. महायुतीचा उमेदवारांनी विजयी करण्याचं लक्ष्य माझ्यापुढे आहे. पक्षाने नांदेड आणि हिंगोलीची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. याशिवाय अन्य जिल्ह्यातही मी सभा होणार आहे”, असं ते म्हणाले.