हिंगोली : मुंबई येथे काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. झालेल्या बैठकीत हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेस पक्षानेच लढवावी, अशा प्रकारची आग्रही मागणी हिंगोली व नांदेड येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लावून धरली असता, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सहमती दर्शवली व हिंगोली व नांदेड लोकसभेच्या मुद्दय़ावर अशोकराव चव्हाण यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली असून तेच याबाबतीत अंतिम निर्णय घेतील, असे पटोले यांनी सांगितले असल्याची माहिती माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी मुंबईत पक्षातील पदाधिकाऱ्यांची लोकसभा निवडणूक संदर्भात बैठक झाली. या बैठकीला हिंगोली व नांदेड येथील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. भाऊ पाटील गोरेगावकर, विधान परिषद सदस्या आमदार प्रज्ञा सातव, प्रदेश पदाधिकारी सचिन नाईक, मुनीर पटेल, संजय देशमुख, काँग्रेसचे अन्य पदाधिकारी झालेल्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेसनेच लढवावी, अशी आग्रही मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मुख्यमंत्री अशोकचव्हाण यांच्याकडे केली होती.



