स्वतःला अंकशास्त्राचा तज्ज्ञ आणि ज्योतिषी म्हणवणारा भोंदूबाबा म्हणजे नाशिकचा अशोक खरात. महिलेचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अशोक खरातला नाशिकच्या कॅनडा कॉर्नर या ठिकाणी असलेल्या त्याच्या कार्यालयातून अटक करण्यात आली. अशोक खरातचा विषय सध्या राज्यभरात चर्चेत आहे. दरम्यान रुपाली चाकणकरांचं नावही या प्रकरणात समोर आलं त्यामुळे त्यांनाही राजीनामा द्यावा लागला आहे. आरोपांच्या फैरी झडत आहेत. अशोक खरातची अटक ते मुख्यमंत्र्यांची आजची प्रतिक्रिया काय काय घडलं ते आपण जाणून घेऊ ठळक घडामोडी.

अशोक खरातचं प्रकरण नेमकं कसं बाहेर आलं?

एका ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर अशोक खरातच्या कृत्यांची पोल खोल झाली असून न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मात्र, पोलिसांना त्याच्या ऑफिसमधून मिळालेल्या पुराव्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. शिवाय अशोक खरातचे रूपाली चाकणकर यांच्यासह अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे.

Ashok Kharat
अशोक खरातला लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

२०१९ मध्ये काय घडलं होतं?

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, २०१९ मध्ये तिची भोंदू अशोक खरातशी ओळख झाली आणि त्याने तिचा विश्वास संपादन करत दैवी शक्ती असल्याचा दावा केला. त्यानंतर तिला वारंवार त्याच्या ऑफिसमध्ये बोलावून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, महिलेने सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये खरातविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. यानंतर या भोंदू अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांबरोबरचे फोटो व्हायरल झाले. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या त्याची पाद्यपूजा करण्यात आल्याचा फोटो व्हायरल झाला आणि रुपाली चाकणकर यांच्यावरही आरोप होऊ लागले. अत्याचाराची प्रकरणं रुपाली चाकणकर यांनी दडपल्याचाही आरोप झाला. दरम्यान यानंतर रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात प्रकरणावर भाष्य केलं आहे. तसेच विरोधकांनी केलेल्या टीकेलाही रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच अशोक खरातची पाद्यपूजा करताना रुपाली चाकणकरांचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्याबाबतही रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलं असून पाद्यपूजा करतानाचा व्हिडीओ हा ६ वर्षांपूर्वीचा असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच शिवनिका संस्थानातील माझ्या सदस्य पदाचा कार्यकाळ २०२५ मध्येच संपला असंही त्या म्हणाल्या.

Rupali Chakankar
रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. (फोटो-रुपाली चाकणकर फेसबुक पेज)

रुपाली चाकणकरांनी राजीनाम्यानंतर हे मु्द्दे मांडले

१) शिवनिका संस्थानात सदस्य होते, ८ ऑगस्ट २०२५ ला माझा कार्यकाळ संपला

२) सार्वजनिक आयुष्यात आपण कुणाला तरी गुरु मानत असतो. अशोक खरात आणि त्यांच्या पत्नीला मी आणि माझ्या कुटुंबाने गुरुस्थानी मानलं. पण पुढे जाऊन ते असं वागतील याची कल्पना नव्हती.

३) पाद्यपूजेचे जे फोटो व्हायरल केले जात आहेत ते फोटो सहा वर्षांपूर्वीचे आहेत. अनेकांनी तेव्हा पाद्यपूजा केली होती तशीच आम्हीही केली होती. पाच वर्षांनी खरात असं काही वागणार आहे याची माहिती आम्हाला कुणालाही नव्हती.

४) अशोक खरातबाबत जेव्हा मला सगळ्या गोष्टी कळल्या तेव्हा धक्का बसला. या प्रकरणी मी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं असून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

५) आम्ही संस्थांनाशी जोडलेलो होतो. याबाबत मीच ट्वीट करून सांगितलं. ते फोटो माझे असून अनेक वर्षांपूर्वीचे होते. अनेक लोकांचे फोटो अशोक खरातबरोबर आहेत. पण महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केलं गेलं.

हे पाच मुद्दे त्यांनी मांडले. मात्र विरोधी पक्षाच्या सुषमा अंधारे तसंच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांनी महिला असल्याने सॉफ्ट टार्गेट केलं गेलं हे दावे खोडून काढले आहेत. तसंच त्यांच्या पक्षाच्या रुपाली ठोंबरे यांनीही रुपाली चाकणकरांवर आरोप केले आहेत. एवढंच नाही तर सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांची अनामिका कापली होती आणि त्यांनी अघोरी पूजा केली होती असाही आरोप केला.

सुषमा अंधारेंचे आरोप काय?

१) पीडितेने मला माहिती दिली की रुपाली चाकणकरांना तंत्र-मंत्र विद्या येत होती. विशिष्ट दिवशी त्या अनामिका कापून घेतली आणि त्या व्यक्तीच्या नावावर असलेल्या बाहुलीवर ते रक्त सांडलं तर सूर्य आणि शुक्र दोन्ही ग्रह अनुकूल होतात असा समज आहे.

२) पहिला फोटो ९ सप्टेंबरचा आहे. ही जखम सप्टेंबर २०२४ ते डिसेंबर २०२४ पर्यंत दिसून येते. स्वयंपाक घरात झालेली जखम तीन ते चार महिने टिकत नाही. २ सप्टेंबर २०२४ ला सोमवती अमावस्या होती असं पंचागानुसार समजतं.

३) रुपाली चाकणकर यांना ताब्यात घेऊन अटक करावी आणि सदर गोष्टींची चौकशी करावी. रुपाली चाकणकर यांची नार्को चाचणी केली जावी.

तृप्ती देसाईंचे आरोप काय?

१) अशोक खरातचं सगळे कारनामे रुपाली चाकणकर यांना माहीत होते.

२) २०२५ मध्ये प्रकरण उघडकीस आलं असतं पण ज्या पीडिता पेन ड्राईव्ह देणार होत्या त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. ज्यामुळे ते पेन ड्राईव्ह मिळालं नाही.

३) अशोक खरातला पाठिशी घालण्याचं काम रुपाली चाकणकरांनी केलं आहे. त्यांची चौकशी झाली पाहिजे.

अंजली दमानियांचा आरोप काय?

“रूपाली चाकणकरांबद्दल प्रश्न विचारताच सुनील तटकरे यांनी पळ काढला. काय लपवायचं आहे असं समजायचं? तटकरेजी, आज तुमची ‘त त प प’ स्पष्ट दिसली. आता मात्र ही बाब इथे थांबणार नाही, ह्या बाईंना वाचवणं कुणालाच शक्य होणार नाही. यावेळी ना त्या सुटणार, ना तुम्ही, आणि हो बाबासाहेबांचे नाव तुमच्या तोंडी शोभत नाही”, असं म्हणत अंजली दमानिया यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केली.

रुपाली ठोंबरे पाटील यांचे रुपाली चाकणकर यांच्यावर काय आरोप?

१) अशोक खरातच्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार रुपाली चाकणकर आहेत. त्यांना अटक झाली पाहिजे.

२) रुपाली चाकणकर यांना अशोक खरातच्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. भोंदूबाबाला त्यांनी सांगितलं होतं की तू काहीही कर मी पदावर बसले आहे. त्यामुळेच भोंदूबाबाने महिलांवर अत्याचार केले.

३) राज्य महिला आयोग चाकणकरांच्या काळात अशोक खरातच चालवत होता. नीट सगळ्या घटना पाहिल्या तर ही बाब लक्षात येईल.

४) अजितदादांना सगळ्या कटू गोष्टी समजल्या होत्या, त्यांनाही रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यायचा होता. पण सुनील तटकरेंनी राजीनामा थांबवला होता.

rupali-thombre-joins-sushama-andhare-in-demanding-resignation-of-women-commission-chief-rupali-chakankar
‘रुपाली विरुद्ध रुपाली’! चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी रुपाली ठोंबरे आक्रमक; अशोक खरात प्रकरणाने महायुतीत खळबळ. (संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशोक खरात प्रकरणाबाबत काय म्हणाले?

हवेत बोलणं, याला काही अर्थ नाही. अशोक खरात प्रकरण गंभीर आहे. आम्ही इंटेलिजन्सच्या आधारे भांडाफोड केला आहे. लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे एकदम महिला पुढे येत नाहीत. त्या पीडितांना धीर देऊन आम्ही महिलांना समोर आणत आहोत. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होतं आहे. नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून हे काम पूर्ण करत आहेत. कुणालाच आम्ही सोडणार नाही. या प्रकरणाला जो राजकीय रंग देण्याचा प्रयत्न चालला आहे तो विनाकारण आहे. विरोधी पक्षातले कोण कोण जायचे खरातांकडे याचे पुरावे माझ्याकडे आहेत. सर्वाधिक पुरावे तर माझ्याकडे आहेत. पण ते पोलिसांकडे आहेत. पोलिसांचं काम पोलीस करत आहेत. खरातांना भेटणाऱ्यांपैकी कुणाचा सहभाग असेल तर त्यावर नक्की कारवाई होईल. पण कुणी भेटलं आहे अशा माणसावर कारवाई करायला लागलो तर मग तुम्हाला माहीत आहे कोण कोण कसं काय करायचं ते तुम्हाला म्हणजेच माध्यमांना माहीत आहे. या प्रकरणात राजकारण करु नये. हा महिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.