मुंबई : अशोक खरात या भोंदू बाबाने राज्यातील हजारो लोकांचे आर्थिक व शारीरिक शोषण केले आहे. मानसिक छळ केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती पाहता यात अनेक प्रभावशाली राजकीय नेते गुंतलेले दिसतात. या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाची सखोल न्यायालयीन किंवा विशेष तपास पथकाकडून चौकशी करावी. सर्व दोषींना कठोरातील कठोर शिक्षा करावी, मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
कुणीही भोंदू बाबा एकट्याने इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक करू शकत नाही. त्यामागे राज्यातील सत्ताधारी, राजकीय नेते, आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचा हात असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सत्य समोर यावे यासाठी, या प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र व कालबद्ध न्यायालयीन किंवा विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्यात यावी. अशोक खरात यांच्याशी संबंधित सर्व मालमत्ता सरकारने ताब्यात घ्यावी.
या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व राजकीय नेत्यांची, अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्तींची नावे जाहीर करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. पीडित नागरिकांना तत्काळ न्याय आणि आर्थिक भरपाई देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी. राज्यातील अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची कठोर अंमलबजावणी करून अशा प्रकारच्या घटनांना कायमचा आळा घालावा, अशी मागणी माकपने केली आहे.
या प्रकरणात अनेक महिलांचे शोषण झालेले असल्याने सरकारने किंवा प्रशासनाने यात कोणत्याही प्रकारची ढिलाई होऊ देऊ नये. आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. असे झाल्यास माकप या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही. देशात आणि राज्यात अंधश्रद्धा, अज्ञान आणि धार्मिक अंधभक्ती यांचा वापर करून जनतेची लूट करण्याचे प्रकार वाढत आहेत. हे केवळ सामाजिक प्रश्न नाहीत, तर सत्ताधारी व्यवस्थेच्या अपयशाचे आणि संगनमताचे द्योतक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक न्याय यांना तिलांजली देणाऱ्या या प्रवृत्तीविरोधात निर्णायक लढा उभारण्याची गरज आहे, असेही माकपने म्हटले आहे.
