अलिबाग: रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वरवटणे येथील वाघमारे कुटुंबातील दोन मुलींची तब्बल तीन वर्षांनंतर आई-वडिलांशी पुनर्भेट झाली आहे. सर्वहारा जन आंदोलन संघटनेच्या प्रयत्नांमुळे हा आई-वडिलांपासून दुरावलेल्या मुली पुन्हा त्यांच्या ताब्यात आले आहेत. आदिवासी समाजातील स्थलांतरण आणि त्यामुळे उद्भवणारे प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहेत.

संतोष जानू वाघमारे, पत्नी सुनीता वाघमारे व त्यांच्या मुली अनिता आणि पूजा वाघमारे हे कुटुंब सुमारे दहा वर्षांपूर्वी कोळसा भट्टीवर काम करण्यासाठी कर्नाटक येथे गेले होते. अनिल चव्हाण (रा. पत्र्याचा तांडा, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांच्याकडे त्यांनी दीर्घकाळ काम केले. मात्र कामाचा मोबदला न मिळणे आणि सततचा त्रास यामुळे वाघमारे दाम्पत्याने ऑक्टोबर २०२५ मध्ये तेथून पळ काढून नागोठणे येथे आश्रय घेतला.

दरम्यान, चव्हाण यांनी वाघमारे दाम्पत्य पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या दोन्ही मुलींना मागील तीन वर्षांपासून आपल्या ताब्यात ठेवले होते. त्यामुळे आई-वडिलांना मुलींना सोबत घेता आले नव्हते.

या घटनेची तक्रार सर्वहारा जन आंदोलन संघटनेकडे आल्यानंतर संघटनेने तत्काळ हालचाली सुरू केल्या. सुरुवातीला अनिल चव्हाण यांनी मुली आपल्या ताब्यात असल्याचे नाकारले, मात्र प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन संघटनेने कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्यानंतर त्यांनी मुली आपल्या ताब्यात असल्याचे मान्य केले.

संघटनेच्या पाठपुराव्यानंतर चव्हाण यांनी  मंगळवेढा येथे अनिता आणि पूजा यांना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुपूर्द केले. यानंतर तब्बल तीन वर्षांनंतर या मुलींची आई-वडिलांशी भावनिक पुनर्भेट झाली, अशी माहिती सर्वहारा जना आंदोलन संघटनेच्या नेत्या उल्का महाजन यांनी दिली.

रायगड जिल्ह्यातील सात तालुके आदिवासीबहुल तालुके म्हणून ओळखले जातात. यात कर्जत खालापूर सुधागड रोहा पेण आणि माणगाव तालुक्यांचा समावेश आहे. रोजगाराच्या शोधात आदिवासी कुटुंब  राज्यातील विविध भागात स्थलांतरित होत असतात. वीट भट्टी कोळसा खाणी काम करण्यासाठी ठेकेदार येऊन या कुटुंबांना घेऊन जातात. नंतर त्यांची पिळवणूक केली जाते. रोजगार सोडून जाऊ नये यासाठी लहान मुलांना वेठीस धरले जाते. यापूर्वीही असेच प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी भर द्यायला हवा अशी मागणी केली जात आहे.