CM Devendra Fadnavis on Ashok Kharat case: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे संबंध महाराष्ट्रात खळबळ उडालेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणाची सविस्तर माहिती देत आतापर्यंत सरकारकडून कोणती कारवाई करण्यात आली, याची माहिती दिली. अशोक खरात याच्या विकृत कृत्यांचा पाढाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत वाचला. या प्रकरणात पीडित महिलांची ओळख सुरक्षित ठेवून तपास कसा केला जात आहे आणि खरातच्या संपत्तीची चौकशी कशी होणार, याचा सविस्तर तपशीलही त्यांनी सादर केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी ६ पीडित महिलांची ओळख पटवून त्यापैकी पाच पीडित महिलांच्या जबाबावरून ५ गुन्हे आणि एका साक्षीदाराच्या जबाबावरून त्याच्या पत्नीविषयी घडलेल्या प्रकाराबाबत एक गुन्हा असे एकूण सहा गुन्हे नोंद केले आहेत.

या संपूर्ण प्रकरणात एकूण आठ गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यापैकी सात गुन्ह्यांचा तपास आयपीएस तेजस्विनी सातपुते यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटीकडून केला जात आहे. तर एका गुन्ह्याचा तपास नाशिक शहर क्राइम युनिटकडून केला जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आतापर्यंत काय काय घडले?

  • २९ डिसेंबर २०२५ रोजी अशोककुमार खरात याने नाशिकच्या वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी दिनेश परब याने खरात आणि एका महिलेचे फोटो पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. फोटो व्हायरल न होऊ देण्यासाठी पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. तसेच हे फोटो राजेंद्र जासूद याने दिल्याचे सांगितले. याप्रकणी दिनेश परब आणि जासूद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
  • आरोपी राजेश परब याला उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन आणि त्याचा सहकारी राजेंद्र जासूदला जिल्हा न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. खरातच्या कार्यालयातील कर्मचारी नीरज जाधव याचा या गुन्ह्यातील सहभागाबाबत आजपर्यंतच्या तपासातून काहीही निष्पन्न झालेले नाही. हा या गुन्ह्याचा पहिला भाग आहे. ज्यात खरातने गुन्हा दाखल केला होता.
  • १८ फेब्रुवारी २०२६ रोजी एका महिलेने शिर्डी येथे तक्रार दिली की, तिचा मॉर्फ केलेला फोटो आरोपी नीरज जाधवने शेअर करून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. यावरून शिर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत नीरज जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
  • या प्रकरणात फिर्यादी महिलेने तिचा मोबाइल तपासासाठी दिला नाही. तसेच तिला कोणत्या नंबरवरून मेसेज आला होता, याची माहिती दिली नाही. आरोपी नीरज जाधवचा शोध घेत असताना अशोक खरातच्या विरोधात एका साक्षीदाराने तपास अधिकाऱ्यांना काही व्हिडीओ दाखवले. त्यात ८ महिलांचे ३५ व्हिडीओ असल्याचे समोर आले.
rupali chakankar on kharat case
खरात प्रकरणावर राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?
  • अशोक खरातने अनेक महिलांना जादूटोणा, तंत्र-मंत्र वापरून त्यांच्याशी अश्लिल चाळे केल्याचे दिसून आले. ज्या साक्षीदाराने हे व्हिडीओ दिले, त्याला खरातकडून जीवाल धोका निर्माण होण्याची भीती होती. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन खरात विरोधातील व्हिडीओ ताब्यात घेतले.
  • खरात देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे १० मार्च २०२६ रोजी त्याच्याविरोधात लुक आऊट सर्क्युलर नोटीस काढून त्याला देशाबाहेर जाण्यापासून रोखले.

१३ मार्च रोजी SIT, १७ मार्चला खरात अटकेत

वावी आणि शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दोन्ही गंभीर गुन्ह्यांचा तापस करण्यासाठी १३ मार्च रोजी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यानंतर १७ मार्च २०२६ रोजी एका महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आपल्या धार्मिक विश्वासाचा फायदा घेऊन आणि गुंगीचे औषध देऊन खरातने अत्याचार केल्याचे पीडितेने सांगितले. या गुन्ह्यानंतर अशोक खरातला त्याच दिवशी रात्री अटक करण्यात आली.