अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला आहे. भोंदू बाबा अशोक खरातने अनेक स्त्रियांचं लैंगिक शोषण केलं आहे. स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातचे अश्लाघ्य व्हिडीओ व्हायरल झाले आणि त्यानंतर १७ मार्चला त्याला अटक करण्यात आली. अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक खरातचं प्रकरण हे अत्यंत गलिच्छ आहे. त्याच्यासारख्या भोंदूंची जागा तुरुंगातच आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
अशोक खरात प्रकरणावर काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
अशोक खरातचं प्रकरण अतिशय वाईट आणि अतिशय गलिच्छ आहे. आस्थेचा बाजार कसा मांडला जातो आणि लोकांना ब्लॅकमेल कसं केलं जातं याचं हे उदाहरण आहे. श्रद्धा असणं हा एक भाग झाला. जोपर्यंत श्रद्धा तुमचं नुकसान करत नाही तोपर्यंत ती उत्तम असते. पण ज्या क्षणी ती तुमचं नुकसान करते ती अंधश्रद्धा होते. भोंदू बाबांनी श्रद्धेला अंधश्रद्धेला परावर्तित केलं की लोक त्यांच्याकडे जातात. राजकीय लोकही आहेत ते देखील जातात. पण फोटो आहेत, कुणी फोन केले ते महत्त्वाचं नाही, त्या पलिकडे काही व्यवहार झाला आहे का? हे पाहिलं पाहिजे. शिवाय अशोक खरात प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने चालला आहे. सोलापूर आणि नगरला तक्रार दाखल झाली तेव्हा त्यांचा आधार घेऊन आम्ही एसआयटी स्थापन केली. खरातला आम्ही गोंधळाच्या अवस्थेत ठेवलं. त्यानंतर नाशिकमधून त्याला अटक करण्यात आली. यानंतर तपास हा अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने सुरु आहे. अनेकदा लोकांना हे माहीत नसतं की अशा प्रकरणांचा तपास कसा चालला आहे. त्यामुळे लोक कमेंट करतात किंवा चर्चेतल्या गोष्टींवर मत व्यक्त करतात. मी तुम्हाला हे स्पष्ट सांगतो की खरात किंवा त्याच्यासारख्या भोंदूबाबांची जागा तुरुंगातच आहे, त्याला तुरुंगातून बाहेर येऊ देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. एबीपी माझाच्या माझा व्हिजन या कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी अशोक खरात प्रकरणावर त्यांनी हे भाष्य केलं.

अशोक खरात मूळचा सिन्नरचा, नाशिकमध्ये बसवलं बस्तान
६७ वर्षीय अशोक खरात हा मूळचा सिन्नरचा आहे. शालेय शिक्षणानंतर तो गायब झाला. त्यानंतर अचानक नाशिकमध्ये येऊन त्याने बस्तान बसवलं. मर्चंट नेव्हीत कॅप्टन असल्याचं तो सुरुवातीला सांगत होता. त्यामुळेच त्याला ‘कॅप्टन’ असं संबोधलं जातं. अशोक खरातला अटक करण्यात आली. अशोक खरातने १५४ देशांमध्ये प्रवास केलाय. त्यामुळे त्याला अनेक देशांच्या भाषा बोलता येतात. तसंच अनेक देशांमधल्या चालीरिती आणि धार्मिक परंपरा याचीही त्याला जाण आहे. २२ वर्षे नेव्हीमध्ये नोकरी करताना आपण १५४ देश फिरल्याचं त्याने सांगितलं होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अशोक खरातचे ५८ व्हिडीओ जप्त
अशोक खरातचे ५८ व्हिडीओ पोलिसांनी जप्त केले आहेत. या व्हिडीओत काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटी यांचाही समावेश आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. भविष्य जाणून घेण्यासाठी नेते, सेलिब्रिटी अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावायचे. अशोक खरातचा एक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसंच आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या भोंदूबाबाचे पाय धुताना दिसत आहेत. यावरुन आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामाही द्यावा लागला.
अशोक खरातने आर्थिक शोषणही केल्याची माहिती समोर
खरातने केवळ शारीरिकच नव्हे तर आर्थिक शोषणही मोठ्या प्रमाणावर केले. त्याने सामान्य दगडांना ‘ऊर्जित’ दगड किंवा यंत्रे असल्याचे सांगून त्यांची हजारो ते लाखो रुपयांना विक्री केली. काही भाविकांना त्याने परदेशात (विशेषतः आग्नेय आशियाई देशांत) जाऊन विशेष विधी करण्यास भाग पाडले, ज्यासाठी त्याने स्वतःचीच एजन्सी वापरून मोठी रक्कम उकळली. मिरगावच्या मंदिरात अमावस्या-पौर्णिमेला अंधाऱ्या वातावरणात बनावट साप सोडून किंवा कृत्रिम ध्वनी वापरून लोकांना ‘साक्षात्कार’ होत असल्याचा बनाव तो रचत असे.

४० कोटींची बेहिशोबी मालमत्ता उघड
नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष तपास पथक स्थापन केले आहे. आतापर्यंतच्या तपासात खरातची नाशिक, पनवेल, पुणे आणि सिन्नर येथे सुमारे ४० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता उघड झाली आहे. यामध्ये आलिशान बंगले, जमिनी आणि व्यावसायिक गाळ्यांचा समावेश आहे. पोलीस आता त्याच्या बँक व्यवहारांची आणि डिजिटल पुराव्यांची (CCTV आणि मोबाईल डेटा) कसून चौकशी करत आहेत.
