अशोक खरात या स्वयंघोषित भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे. अशोक खरातला वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे. मात्र या भोंदूबाबाचं प्रकरण हे एपस्टिन फाईल्सपेक्षा भयंकर आहे असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकरणावर का गप्प बसले आहेत असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

महाराष्ट्रातल्या राजकारण्यांचे अध्यात्मिक मार्गदर्शक अशोक खरात यांना बलात्काराच्या प्रकरणात अटक केली आहे. बलात्काराच्या प्रकरणातलं एक प्रकरण नाही, अनेक प्रकरणं समोर येत आहेत. ५८ व्हिडीओ जप्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातल्या सामाजिक, राजकीय आणि इतर क्षेत्रातल्या अनेकांचे पुरावे पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात आहेत असं सांगितलं जातं. महाराष्ट्राने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मंजूर केला आहे. मग महिला आयोगाच्या अध्यक्षा असतील, मंत्री असतील, आमदार असतील हे सगळे अंधश्रद्धा कुरवाळत कुणी त्या बाबाचं पाद्यपूजन करत आहेत, कुणी पूजेला बसलं आहे. कुणी जादूटोणा करतं आहे. ज्यांची छायाचित्रं आली आहेत त्या सगळ्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीही आहेत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले पाहिजेत. रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्यांचं काम हे असतं की महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणं. पण जर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचे पाय रुपाली चाकणकर धुत असतील, मंत्री त्यांच्या चरणाशी बसत असतील तर या सगळ्यांना पदावर कसं काय ठेवू शकतात? देवेंद्र फडणवीस यांना थोडी जरी चाड असेल तर या सगळ्यांना पदावरुन दूर करावं, चौकशी समिती नेमावी आणि निकाल लागत नाही तोपर्यंत यांना पदांपासून दूर करावं. सगळ्यात आधी महिला आयोगाच्या अध्यक्षांना पायउतार केलं पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

राज्याच्या पुरोगामी प्रतिमेला कलंक लावणारा हा प्रकार-राऊत

महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला कलंक लावणारा हा प्रकार आहे. महाराष्ट्र हा ढोंग आणि अंधश्रद्धा यांच्याविरोधात लढणारा आहे. देशातलं पहिलं राज्य आहे ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा केला. पण राजकारणातले मंत्रीच सत्ता राखण्यासाठी अशा प्रकारे अंधश्रद्धा निर्माण करत असतील तर त्यांना तातडीने बडतर्फ केलं पाहिजे मुख्यमंत्री. रुपाली चाकणकर यांच्यावर अनेक आरोप यााआधीही झाले आहेत. भोंदूबाबाने अनेक महिलांचं शोषण केलं, बलात्कार केले. त्यांच्या पायाचं तीर्थ प्राशन करण्यासाठी महाराष्ट्रातले मंत्री जातात, महिला आयोगाच्या अध्यक्षा जातात हे अत्यंत किळसवाणं कृत्य राज्यात घडत असता मुख्यमंत्री गप्प बसत असतील तर ही गोष्ट दुर्दैवी आहे असंही संजय राऊत म्हणाले. तसंच रुपाली चाकणकर या खोटं बोलत आहेत, खरंतर त्यांनी त्या पदावरच राहू नये. अनेक गोष्टी चर्चेला येत होत्या, एका महिलेने तक्रार केली आणि नंतर हा प्रकार उघड झाला. महिलांचे हुंदके ऐकायला येत होते. पण दबाव आणून अनेकांना रोखल्याचं समोर आलं आहे.

खरात प्रकरण एपस्टिन फाईल्सपेक्षाही भयंकर

अशोक खरातचं प्रकरण हे एपस्टिन फाईल्स पेक्षा भयंकर आहे. मुख्यमंत्री कान, नाक, डोळे यांना बंद करुन बसले आहेत. या भोंदूबाबाकडे कोण जात होतं? अघोरी कृत्य कोण करत होतं ते मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गुप्तचर यंत्रणेकडून जाणून घ्यावं.