अशोक खरात या भोंदूबाबाला मागील आठवड्यात लैंगिक शोषण, बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनाही महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. कारण रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचे फोटोही व्हायरल झाले होते. दरम्यान यासंदर्भात जे राजकारण सुरु आहे त्याचं सविस्तर विश्लेषण लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी दृष्टिकोन या विशेष व्हिडीओत केलं आहे. आपण जाणून घेऊ त्यांनी काय म्हटलं आहे.

Ashok Kharat Nashik fake baba fraud case
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात : अघोरी पूजेच्या नावाखाली महिलांची फसवणूक (संग्रहित छायाचित्र)

काय म्हटलं आहे गिरीश कुबेर यांनी?

“दृष्टिकोनचा आपला विषय अर्थातच अशोक खरात हा आहे. ज्या प्रांताला अनेक लेखक लँड ऑफ रिझन्स म्हणतात, ज्या प्रांततल्या विचारवंतांनी बुद्धिवंतांच्या बुद्धीवादाचं सिंचन केलं आहे त्या प्रांताच अशा प्रकारची दु्र्दैवी आणि लाजिरवाणी घटना दुसरी नाही. तुकाराम महाराज, समर्थ रामदास असतील, अगदी कवयित्रींमधल्या बहिणाबाई असतील, कुसुमाग्राज असतील हे सगळे बुद्धिवादाचा प्रभाव असलेले कवी होते. त्या संतांची परंपरा आपण सांगतो. या संत परंपरेतलं महत्त्वाचं नाव होतं गाडगेबाबा. गाडगेबाबा नमस्कार करायला गेलं तरी पाठीत सोटा हाणायचे. रामदास स्वामी अशा गुरु आणि भोंदूंबाबत म्हणतात ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी त्यजावे. पैसा-अडका म्हणतो त्यातला अडका, पैशांपेक्षा ज्याची किंमत कमी आहे असे लोक. अशा महाराष्ट्रात असे भोंदू सापडावेत ही बाब महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या नेत्यांची बुद्धिवादाची परंपरा घालवून बसतो की काय हा प्रश्न या निमित्ताने पडतो. जे काही तपशील बाहेर येत आहेत ते जर खरे असतील तर पुरुषांमध्ये चर्चा करणं लाज वाटेल इतक्या भयंकर गोष्टी समोर येत आहेत.” असं गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.

रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला ते योग्यच आहे-गिरीश कुबेर

गिरीश कुबेर पुढे म्हणाले, “यातला जो पहिला राजकीय चेहरा होता तो महिला आय़ोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा. मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा घेतला ते योग्यच आहे. अशोक खरातची चौकशी होऊ नये म्हणून महिला आयोगाच्या अध्यक्षांनी परिसरातल्या पोलीस स्थानकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. हे आणखीनच वाईट आहे. महिलांची इभ्रत, प्रतिष्ठा यासाठी ज्यांनी काम करणं अपेक्षित अशा यंत्रणेकडूनच तथाकथित बाबावर कारवाई होऊ नये म्हणून प्रयत्न होत असतील तर यापेक्षा दुर्दैवी काय? जे तपशील समोर येत आहेत ते धक्कादायक आहेत. धर्म, अध्यात्म हे सगळे मुद्दे याच्या पलिकडचे आहेत. त्याबाबत कुणी कुणाला काही सांगू शकत नाही, सांगूही नये. श्रद्धेचा प्रश्न आला तर टीका असू शकत नाही. पण ही श्रद्धा नाही. गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप जर या गृहस्थावर होत असेल तर यापेक्षा घृणास्पद आणि कीळसवाणं कृत्य कसं असणार? एका बाजूला राजकीय नेत्यांशी त्याचे असेलेले राजकीय भाग पाहिला तर तो एक भाग झाला. पण सामान्य महिलांशी हा इसम जे काही वागला आहे त्यांची जगण्यावरची वासनाच उडून जाऊ शकेल असे तपशील बाहेर येत आहेत. अत्यंत गलिच्छ, घाण आणि भयाण वाटावं असं सगळं समोर आलं आहे.”

आता मुख्यमंत्र्यांकडून एकच अपेक्षा आहे की…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी कारवाई केली आहे ती योग्यच आहे. पण एकच अपेक्षा आहे की त्याचं जे काही तार्किकतेकडे जाऊन त्यातल्या संबंधितांना शिक्षा व्हायला हवी. राज्याचे शिक्षण मंत्रीही त्याच्याकडून सल्ला घेत होते, यापेक्षा महाराष्ट्रासाठी दुःखद अंधकारमय भविष्य नाही. त्यामुळे या अशोक खरातला शिक्षा झालीच पाहिजे. पण ज्यांच्यामुळे याचं भलं झालं त्यांनाही शिक्षा व्हायला हवी. खरातने २०० कोटींची माया जमवली आहे, पाण्याची जोडणी कशी मिळाली ते समोर येतंय. हे सगळं ज्यांनी ज्यांनी केलं त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. कारण हे सगळं कृत्य हे घटनाविरोधी आहे. असंही गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.