Ashok Kharat Case Latest Update : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे. या भोंदूबाबा अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली असून त्याची एसआयटी चौकशी सुरू आहे. या प्रकरणात दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. याच अशोक खरातबरोबर राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत. या प्रकरणात रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

दरम्यान, याच अशोक खरातचा आता अटकेनंतरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अशोक खरातला व्यवस्थित चालता देखील येत नसल्याचं दिसत आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातची नाशिक पोलिसांनी एक प्रकारे वरात काढत त्याच्याकडून ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ असं वदवून घेतल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

भोंदूबाबा अशोक खरातला चौकशीसाठी पोलीस घेऊन जात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र, यावेळी भोंदूबाबा अशोक खरातची अवस्था एवढी बिकट झाली आहे की त्याला चालणं सुद्धा कठीण झाल्याचं दिसत आहे. तसेच तो असं म्हणताना दिसत आहे की, ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’, असं तो म्हणत आहे. तसेच ‘आता माझ्यात ताकद राहिली नाही’, असंही अशोक खरात म्हणत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं भाष्य

अशोक खरात प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया देत मोठं भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “अशोक खरात प्रकरण गंभीर आहे. आम्ही इंटेलिजन्सच्या आधारे भांडाफोड केला. लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे एकदम महिला पुढे येत नाहीत. त्या पीडितांना धीर देऊन आम्ही महिलांना समोर आणत आहोत. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होत आहे. नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून हे काम पूर्ण करत आहेत. कुणालाच आम्ही सोडणार नाही. या प्रकरणाला जो राजकीय रंग देण्याचा प्रयत्न चालला आहे तो विनाकारण आहे. विरोधी पक्षातले कोण-कोण खरातांकडे जायचे याचे पुरावे माझ्याकडे आहेत. सर्वाधिक पुरावे तर माझ्याकडे आहेत. पण ते पोलिसांकडे आहेत. पोलिसांचं काम पोलीस करत आहेत. खरातांना भेटणाऱ्यांपैकी कुणाचा सहभाग असेल तर त्यावर नक्की कारवाई होईल. पण कुणी भेटलं आहे अशा माणसावर कारवाई करायला लागलो तर मग तुम्हाला माहीत आहे कोण कोण कसं काय करायचं ते तुम्हाला म्हणजेच माध्यमांना माहीत आहे. या प्रकरणात राजकारण करु नये, हा महिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.