Ashok Kharat : अशोक खरात या नाशिकच्या भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. महिलांचं लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांना या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तसंच अंजली दमानिया यांनीही या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे केले आहेत. एकनाथ शिंदे यांनी १७ कॉल केले आहेत असा आरोप अंजली दमानियांनी केला. तर रुपाली चाकणकर यांनी १७७ कॉल केले आहेत. सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत अशी मागणी होते आहे. अशात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांनी त्यांची परखड मतं मांडली आहेत.
शाम मानव म्हणतात, भोंदूबाबा असा काही प्रकार नसतो
भोंदूबाबा असा काही प्रकार नसतो, बाबा असतो आणि प्रत्येक बाबा जो दैवी शक्ती आहे असं सांगतो आणि दैवी शक्ती आहे असं सांगतो ते सगळेच्या सगळे भोंदू असतात आणि खोटारडे असतात. या जगातला बाबा तो कोणीही असो जो काहीतरी देवाचा आशीर्वाद माझ्यामुळे तुम्हाला मिळतो अशी बतावणी करतात ते सगळे खोटे आणि भोंदू असतात. तरी बरं झालं की संत हा शब्द अशोक खरातसाठी कुणी वापरला नाही. अशोक खरातसारख्या बाबांना लोक का फसतात? तर खरात हा काही नवा बाबा नाही किंवा अपवादही नाही. १९८२ च्या सुरुवातीला आम्ही जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुरु केलं तेव्हा शेकडो बाबा असे पाहिले जे स्त्रियांचा उपभोग घेत होते. सुरुवातीला मला त्याचा धक्का बसला होता. पण त्या काळातही बदमाश बाबा आहेत असं वाटायचं आणि इतर काही बाबा चांगले आहेत असं वाटायचं. आता मात्र मी १०० टक्के सांगू शकतो की आता असा कुणीही बाबा नाही जो स्त्रियांचा उपभोग घेत नाहीत. काही लोक होमो सेक्स्शुअल असतात, ते बाबा पुरुषांचा उपभोग घेतात. असं मत शाम मानव यांनी नवराष्ट्रच्या पॉडकास्टमध्ये मांडलं.
हिंदू धर्मातच माणूस देव होऊ शकतो, इतर धर्मांमध्ये नाही-शाम मानव
आपला एखादा गुरु असावा असं वाटत असतं. कारण आपल्या संस्कारातून ते येतं. व्यावहारिक भलं होईल असं वाटत असतं. चांगली पत्नी मिळेल, पैसे मिळतील. तसंच मोक्ष हवा असेल तर गुरु हवा अशी एक इच्छा दिसून येते. आपल्याला निर्णय घेण्यासाठी गुरु हवा अशीही संकल्पना समाजात रुढ आहे. अशा गुरुला लोक तन-मन आणि धन अर्पण करतात. तन म्हणजे काय तर शरीर अर्पण करणं. पुरुष याचा अर्थ काढतो तर शारिरीक मेहनत अर्पण करणं. त्यामुळे अनेक बाबांकडे रात्रंदिवस राबणारे पुरुष असतात किंवा जी कमाई करतात ती बाबाला अर्पण करतात. श्रद्धा म्हणजे काय? अढळ श्रद्धा म्हणजे काय? याची उदाहरणं दिली जातात. त्यांचा परिणाम आपसूकपणे आपल्या मनावर होतो. भारतातला हिंदू धर्म हा एकमात्र धर्म आहे ज्या धर्मात माणूस स्वतः देव होऊ शकतो. बाकीच्या धर्मांमध्ये माणूस देव होऊ शकत नाही. इतर धर्मांमध्ये प्रेषित असतो, तो निर्माण व्हावा लागतो असं शाम मानव यांनी म्हटलं आहे. सामान्य माणसं हे मानतात कारण माणूस देव होऊ शकतो हे आपल्याकडे लहानपणापासून संस्कार घडवले जातात. त्यामुळे अनेक बाबा स्वतःला देव म्हणून घोषित करतो. असा बाबा मग चमत्कार करतो, आजार बरे करतो आणि इतर गोष्टी करतो ज्या इतरांना करता येणार नाहीत.

गुलबबाबा स्वतःला कृष्णाचा अवतार आहे असं सांगायचा-शाम मानव
गुलाबबाबा नावाच्या भोंदूचं पितळ आम्ही उघडं पाडलं होतं, तो स्वतःला कृष्णाचा अवतार आहे असं सांगायचा. त्याचेही शंकरराव चव्हाणांपासून अनेक राजकीय भक्त होते. वि.ग. कावळे हे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यावेळी गुलाबबाबा अनेक चमत्कार करायचे. मी उत्सुकतने त्यांना पाहण्यासाठी गेलो होतो. कावळेसर जेव्हा आतमध्ये गेले होते. त्यांनी सांगितलं की हा बाबा आपण कृष्णाचा अवतार आहे हे सांगतो आहे, त्याची अंघोळ सुरु होती आणि त्या ठिकाणी फक्त स्त्रिया होत्या. शिवाय अंघोळ सुरु असताना तो स्त्रियांच्या छातीवर पाणी उडवत होता. विद्यानंद नावाचा बाबा होता, त्यावेळी मी नग्न अवस्थेत त्या बाबाला आणि एका स्त्रीला पाहिलं. मला वाटलं हे बाबा बदमाश आहेत. इतर बाबा कदाचित चांगले असतील. पण जसजसे अनुभव येत गेले, तसं कळलं की सगळे बाबा बदमाशच असतात.
तर महिला आयोगाच्या माजी अध्यक्षांनाही शिक्षा होऊ शकते-शाम मानव
अशोक खरातने जे केलं ती शोषणाची परंपरा राज्यात दीर्घकाळ चालत आली आहे. खरात किंवा त्याच्यासारख्या बाबांना समजतं की आपल्या कह्यात स्त्री सहज येते आहे. त्यानंतर आपल्याला हवी ती स्त्री भोगायला मिळाली पाहिजे ही भावना त्या बाबामध्ये निर्माण होते. मी बाबा आहे, दैवी शक्ती आहे, माझ्याशी संबंध ठेवलेस तर तुझं भलं होणार आहे हेच फक्त भासवावं लागतं. बाकी खरात काय किंवा इतर कुणाला वेगळं काही करावं लागत नाही. अशोक खरातने सांगितलं ना पोलिसांना की एकाही स्त्रीवर मी जबरदस्ती केलेली नाही. ते खरंही असू शकतो, कारण त्याने तसा आभास निर्माण करावा लागतो, तो अशोक खरातने केला असेल. महिला आयोगाच्या अध्यक्षाही अशोक खरातकडे जात होत्या. त्या जात असतील तर तो प्रश्न नाही, पण त्या जर त्यांच्यासह इतर स्त्रियांना घेऊन गेल्या असतील तर आणि हे सांगितलं असेल अशोक खरात माझे गुरु आहेत आणि इंप्रेशन निर्माण केलं असेल तर जादूटोणा विरोधी कायद्यात प्रसार करणे हा देखील गुन्हा आहे. त्यांना समान शिक्षा होऊ शकते अशी तरतूद कायद्यात आहे, असं शाम मानव यांनी सांगितलं.

अशोक खरात प्रकरण एकनाथ शिंदेच्या सहभागामुळेच उघडकीस आलं, शाम मानव यांचा दावा
अशोक खरातसारखी प्रकरणं का येणार नाहीत उघडकीस? खरात प्रकरणासारखी अनेक प्रकरणं महाराष्ट्रात आहेत, ती दिवसेंदिवस वाढणार आहेत. जेव्हा संपूर्ण सरकारच अशा बाबांच्या पाठिशी असतं, त्यांना घेऊन हिंडत असतं, त्यांचे दौरे आखत असतं यामध्ये सरकार अंतर्भूत असतं. सरकारचे अधिकारी खोटं बोलतात की कायदे लागू होत नाहीत मग दुसरं काय निष्पन्न होणार? असा प्रश्न शाम मानव यांनी विचारला आहे. जादूटोणा विरोधी कायदा राबवण्याची सध्याच्या सरकारची इच्छा नाही. एकनाथ शिंदे यांचीही इच्छा नव्हती. आताही नाही. त्यामुळे या सरकारमध्ये अशा गोष्टींना खतपाणी घालायचं आहे असंही शाम मानव यांनी म्हटलं आहे. अशोक खरात प्रकरण बाहेर आलं याचं एकमात्र कारण आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेंचा यात सहभाग नसता तर हे प्रकरण बाहेर आलं नसतं. एकनाथ शिंदेंचा सहभाग असल्याने हे प्रकरण बाहेर आलं. या प्रकरणात एसआयटी स्थापन झाली आहे. त्यामुळे मी जाणीवपूर्वक शांत राहिलो काही बोललो नाही. पोलिसांनी हे प्रकरण नीट हाताळलं नसतं तर मी बोललो असतो असंही शाम मानव यांनी म्हटलं आहे.
