Rupali Chakankar Resignation: नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकारण तापले असून विरोधकांनी चाकणकरांसह सरकारवर जोरदार टीका केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारमधील अनेक मंत्री भोंदूबाबांच्या सल्ल्याने काम करतात, असा गंभीर आरोप केला. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चाकणकर या महिला आयोगाच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक अकार्यक्षम अध्यक्षा असल्याची टीका केली.

“कुणीतरी तिथे घेऊन गेले असेल”

दरम्यान, राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सावध भूमिका घेतली. “कॅप्टन अशोक खरातबाबत मला फारशी माहिती नाही. चाकणकर पुण्याच्या आहेत, त्यांना कुणीतरी तिथे घेऊन गेले असेल. पोलीस चौकशीत सर्व बाबी समोर येतील,” असे ते म्हणाले.

महिला प्रदेशाध्यक्ष पदाबद्दल काय निर्णय होणार?

चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला, तरी त्या अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, त्या पदाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाचा आहे. “महिला आयोग हे शासकीय पद असून त्यासंदर्भातील निर्णय सरकारकडून घेतला जातो. मात्र पक्षपदाबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

राजीनामा देण्यास उशीर का?

चाकणकर यांचा राजीनामा उशिरा का घेतला, याबाबतही भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले. “कोणत्याही आरोपाची सत्यता तपासल्याशिवाय तातडीने निर्णय घेणे योग्य नाही. चर्चा आणि माहितीच्या आधारेच निर्णय घेतला गेला असेल,” असे ते म्हणाले.

“अंधश्रद्धेपासून दूर राहा”

अंधश्रद्धेबाबत मत व्यक्त करताना भुजबळ म्हणाले, “अंधश्रद्धेपासून दूर राहणे गरजेचे आहे. ध्यान, योग, दर्शन यावर विश्वास ठेवावा. काही चांगले गुरुजी समाजासाठी कार्य करतात, मात्र अशा घटनांमुळे सर्वांचाच गैरसमज होतो.”

दरम्यान, अशोक खरात यांच्या संस्थांशी संबंधित असण्याबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले, “कधी कधी मदतीच्या हेतूने एखाद्या संस्थेशी जोडले जाते. मोठ्या पदावरील व्यक्ती असल्याने त्यांचा उपयोग होईल या अपेक्षेनेही अशा भूमिका दिल्या जातात.” या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून पुढील तपासात आणखी कोणते खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.