Rupali Chakankar and Ashok Kharat: महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील कॅप्टन अशोक खरात प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी (ता. २०) राजीनामा दिला. चाकणकर यांचे भोंदूबाबा खरात याच्याबरोबर अनेक फोटो आणि पाद्यपूजा करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. चाकणकर यांच्यासोबतच राज्यातील अनेक मंत्री आणि मोठे नेते खरातच्या संपर्कात होते आणि त्याच्या सल्ल्यानुसार काम करत होते. तसेच फडणवीसांचे सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्नही केला जात आहे, असा आरोप शिवसेना (उबाठा गट) नेते संजय राऊत यांनी केला. राऊत यांनी शनिवारी (ता.२१) पत्रकार परिषद घेत हे आरोप केले.
अशोक खरात शिक्षण विभागातील बदल्या करायचा?
राऊत म्हणाले, दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना शिक्षण विभागातील अनेक महत्त्वाच्या बदल्या आणि बढत्या भोंदूबाबा अशोक खरात यांच्या सल्ल्यानुसार केल्या जात होत्या. ट्रायडंट हॉटेलमध्ये बसून ही कामे करून घेतली जात होती. त्या काळात शिक्षण खाते खरात चालवत होते. हिंदुत्वाच्या नावाखाली भोंदूगिरी सुरू आहे. विनायक दामोदर सावरकरांना अंधश्रद्धा आणि भोंदूगिरी मान्य नव्हती; हे हिंदुत्व नाही. अशा प्रकारे अंधश्रद्धेने काम करणाऱ्या मंत्र्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करावी, असेही राऊत म्हणाले.
फडणीसांचे सरकार पाडण्यासाठी विधी
दीपक केसरकर, एकनाथ शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील हे खरातचा सल्ला घेत होते. सध्याच्या मंत्रिमंडळातील नऊ मंत्री त्या बाबाचा सल्ला घेत होते. केसरकर शिक्षणमंत्री असताना त्यांचे खाते भोंदूबाबा चालवत होते, असा आरोपही संजय राऊत यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे सरकार उलथविण्यासाठी काही विधी चालू होते, असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला.
“सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा”
विरोधकांनी चाकणकर यांच्या राजीनाम्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना “राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षा” अशी टीका केली. ते म्हणाले, “रुपाली चाकणकर यांनी राजीनामा तर दिला, पण राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला दिसत नाही. स्वेच्छेने वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. म्हणजे खरात प्रकरणात महिलांवर, पत्रकारांवर टाकलेला दबाव, तसेच या प्रकरणी पोलिस तक्रार होऊ नये म्हणून केलेले प्रयत्न याबाबत त्यांना कुठलाही खेद किंवा चूक झाल्याची जाणीव नाही.”
“खरातांना आम्ही दोघांनी गुरू मानले होते”
या सर्व आरोपांवर रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “जे कृत्य घडले आहे, त्याचे समर्थन आम्ही करणार नाही. पोलिसांनी त्याचा सखोल तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करावी. समाजात आपण आयुष्य जगताना कोणालातरी गुरु मानत असतो. खरात दाम्पत्याला मी आणि माझ्या पतीने गुरु मानले होते. गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही शैक्षणिक साहित्य वाटपासाठी तिथे उपस्थित राहत होतो. आम्ही त्यांना गुरु मानल्यामुळे त्या कार्यक्रमात सहभागी होत होतो. मात्र, त्यांची दुसरी बाजू आमच्यासमोर कधीच आली नव्हती.”
