Ashok Kharat Nashik Case Viral Video Leak Police Update: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रासह देशाला हादरवून सोडले आहे. धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे व्हिडीओ नेमेके कसे बाहेर आले? पोलीसांकडून काही चूक झाली का? याबद्दल नाशिकचे विद्यमान पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी माहिती दिली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कर्णिक यांनी याबद्दल माहिती दिली आहे. पोलिसांकडे जे व्हिडीओ होते त्यातील एकही व्हिडीओ बाहेर गेलेला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुढे बोलताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की, हे जे व्हिडीओचा प्रकार आहे तो खरातच्या ऑफिसमध्ये जो ऑफिसबॉय होता त्याच्या ७ महिने गर्भवती असलेल्या पत्नीचा खरातने विनयभंग केला. त्यावेळी तो खरातच्या विरोधात गेला आणि त्याने काही रेकॉर्डिंग्ज केले. ते व्हिडीओ त्याने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले. कारण खरात त्याच्यावर दबाव आणत होता. त्याला स्वत:ला, त्याच्या बायको आणि मुलांना मारण्याची धमकी त्याने दिली होती.”

खरातने धमकी दिल्याने, माझ्या जीवाला काही बरं-वाईट झालं तर आपण हे व्हिडीओ बाहेर आणा असे म्हणून ऑफिस बॉयने वेगवेगळ्या ठिकाणी हे व्हिडीओ ठेवलेले होते, असे कर्णिक यांनी सांगितले. पुढे ज्यांच्याकडे हे वेगवेगळ्या ठिकाणी व्हिडीओ ठेवले होते तेही कदाचित टार्गेटवर आले, आणि त्यांनीही आपल्या जीवाला काही बरं-वाईट झालं तर हे व्हिडीओ बाहेर आणा असे म्हणून इतर दोन-चार ठिकाणी ते ठेवले. जेणेकरून हे प्रकरण दबलं जाणार नाही. मला वाटतं अशातून कुठूनतरी हे व्हिडीओ बाहेर आले आहेत, पोलिसांनी एकही व्हिडीओ ओपन केलेला नाही, असे कर्णिक यांनी स्पष्ट केले.

हे व्हिडीओ जीवाच्या भीतीने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले. त्यातील काही व्हिडीओ बाहेर आले असावेत. किंवा काही व्हिडीओ आपण पेन ड्राईव्ह तपासण्यासाठी दिला आणि तो तेथेच राहिला, अशा प्रकारे बाहेर आले असावेत असे कर्णिक म्हणाले.

आज आम्ही फेसबूक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर ६५ अकांउंट्सवर गुन्हा दाखल केला आहे. बरेचजण एखाद्या महिलेचा चेहरा मॉर्फ करून देखील असे व्हिडीओ चालवत आहेत. काही व्हिडीओ असे देखील आहेत ज्यातील महिलेचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. काही एआय जनरेटेड व्हिडीओ देखील आहेत. यामध्ये एक नगरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकध्ये आम्ही आम्ही ६५ अकाउंट्सवर गुन्हा दाखल केला आहे. आम्ही यात कठोर कारवाई करू, कारण हा प्रकार विकृत आहे आणि तो आम्ही खपवून घेणार नाहीत, असे कर्णिक म्हणाले.