Ashok Kharat Nashik Fake Baba Case: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणाच्या चौकशीतून रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आतापर्यंत खरातवर एकूण नऊ गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी पीडितांना समोर येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहन केलेले आहे. खरात स्वतःला अंकशास्त्राचा आणि ज्योतिषाचा तज्ज्ञ म्हणवून घेत होता. मात्र तो स्वतः दहावीला गणिताच्या परीक्षेत नापास झाल्याची माहिती मिळत आहे. त्याला गणितामध्ये केवळ २८ गुण मिळाले होते.
एबीपी माझा वृत्तवाहिनीने अशोख खरातच्या मूळ गावी आणि त्याच्या शाळेत जाऊन माहिती घेतली. त्याला ओळखणाऱ्या व्यक्तींशी बातचीत केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सिन्नर तालुक्यातील वावी गावातील रयत शिक्षण संस्थेच्या गावातील शाळेत खरातने शिक्षण घेतले होते. या शाळेतील माजी विद्यार्थी खरातवर संताप व्यक्त करत आहेत.
एका विद्यार्थ्याने सांगितले की, खरात सारख्या भंगार व्यक्तीमुळे आमच्या वावी गावाचे नाव वाईट होत आहे. त्याच्या लाजिरवाण्या कृत्यामुळे आता नको त्या गोष्टीसाठी आमच्या गावाचा उल्लेख केला जात आहे. त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करून त्याला शिक्षा करावी.
वावी गावातील एका ग्रामस्थांनी सांगितले की, अशोक खरात कॅप्टन म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाही. वावी किंवा मीरगाव मधील कुणीही त्याच्या आश्रमात जात नव्हते. तो गरीबांसाठी नव्हता तर फक्त श्रीमंत भक्तांसाठी होता. तो गरीब माणसांना भेटत नव्हता. आम्हाला त्याची पार्श्वभूमी माहीत असल्यामुळे आम्ही त्याला महत्त्व देत नव्हतो.
दहावीला किती गुण?
विविध माध्यमांमध्ये खरातच्या दहावीचा निकाल व्हायरल होत आहे. त्याला गणितात फक्त २८ गुण मिळाले असून तो नापास झाला होता. इतर विषय जसे की, मराठी, ३९, इंग्रजी ३७, विज्ञान ६२, समाजशास्त्र ३८ आणि हिंदीत ४७ गुण मिळाले होते.
कोंबडी चोर म्हणून गावात बदनाम
वावीजवळच एका गावात अशोक खरातचे बालपण गेले होते. कोंबडी चोर या नावाने त्यांना ओळखले जायचे, अशी आठवण वावीमधील ग्रामस्थांनी सांगितली. लहानपणी घरातून अंडी चोरून आणत ती शाळेत विकण्याचे काम खरात करत असे.
मोठे नेते मॅजिकला बळी पडले
मोठमोठे नेते, अधिकारी या भोंदूबाबाच्या जाळ्यात कसे ओढले गेले, याबद्दल गावातील तरूण आणि इतर ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करतात. लोक मॅजिक पाहून भुलतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे गावातील तरूण म्हणतात. भारत महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला मॅजिक महत्त्वाचे की लॉजिक? असा प्रश्न गावातील तरूणाने एबीपीशी बोलताना उपस्थित केला.
