Maharashtra Top 5 Political News: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातविरोधात आजही राज्यभर तुफान चर्चा झाली. त्याने केलेल्या कारनाम्याविषयी त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे. दरम्यान, यावरून राजकीय नेत्यांनी प्रचंड चिखलफेक केली. अर्थसंकल्पीय अधिवेशात दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांतील नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. तर, सभागृहाबाहेरही नेत्यांनी यावर आपली मते प्रदर्शित केली. दुसरीकडे सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून प्रचंड गोंधळ झाला. आज दिवसभरात या प्रकरणांवरून नेते मंडळींनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहुयात.
‘भाजपाबरोबरच्या युतीत आम्हाला काही कटू अनुभव आले’, शंभूराज देसाई यांचं मोठं वक्तव्य
“शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेली शिवसेना-भाजपा युती टिकवावी म्हणून आम्ही ती भूमिका घेतली. आता त्या युतीमध्ये आम्हाला कालच्या सारखे काही कटू अनुभव आले. पण ते सोडून द्या. ते योग्य त्या व्यासपीठावर आम्ही मांडू आणि ते दुरुस्त देखील होतील. पण अशा पद्धतीने आम्हाला कुठेही डिवचण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही वस्तुस्थिती निदर्शनास आणली याचा अर्थ आम्ही हदबल आहोत असं नाही”, असं शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे.
स्वत:ला वाघ म्हणून घेणारे शेपटी घालून बसलेत – अनिल परब
“सत्ताधारी मंत्री म्हणजेच सरकार पोलिसांचा मार खात आहे. मंत्रीच मार खात आहेत, तर सामान्य नागरिकांना काय न्याय देणार आहात? काही वर्षांपूर्वी आमचा स्वाभिमान दुखावला गेला. अजित पवार आम्हाला निधी देत नाही. आम्ही वाघाचे बच्चे आहोत म्हणून बाहेर पडला. आता मार खाल्ला तरी भारतीय जनता पक्षाचे नाव घ्यायला घाबरता. कुठे गेला तुमचा स्वाभिमान. शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मार खात असतील तर संरक्षण कोण कुणाचे करणार ? स्वत:ला वाघ म्हणून घेणारे शेपटी घालून बसले आहेत. आज शहीद दिन आहे. सत्ता सोडा. सत्तेला लाथ मारून बाहेर पडा, असे आव्हान परब यांनी दिले.
रुपाली चाकणकर अशोक खरातच्या जास्त जवळ गेल्या होत्या – जितेंद्र आव्हाड
परमेश्वराने मला वाचवलं. अनेकवेळा मला आमंत्रण आलं होतं, अनेकांनी मला सांगितलं तिथे जाऊन येऊया. पण माझी गाडी तिथे कधी वळली नाही, नाहीतर माझा फोटो पहिला दाखवला असता. बाकीचे राहिले असते लांब. महाराष्ट्र वेगळ्या ढाच्यातून गेलाय. बुद्धांचं नाव घेतो तेव्हा बुद्ध एका व्यवस्थेविरुद्ध लढले. भेदभावाविरोधात लढले, महावीर जैन, बसवेश्वर आण्णा, ज्ञानेश्वर महाराज, महात्मा फुले, शिवाजी महाराज लढले. हे सर्व अनिष्ट प्रथेविरोधात लढले. पण गेल्या काही वर्षांत काळ्या जादूला महाराष्ट्रात राजाश्रय मिळाला. अशोक खरात हा एप्स्टिनचा बाप आहे. त्याला तिथे राजाश्रय मिळाला अन् यालाही. रुपाली चाकणकर त्याच्या जास्तच जवळ गेल्या होत्या. त्यांचे घरगुती संबंध होते. पण महत्त्वाच्या पदावर असल्यावर भोगावं लागतं. ते त्यांना भोगावं लागलं”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
अशोक खरातचे कारनामे सुरु असताना फडणवीस झोपा काढत होते का – हर्षवर्धन सपकाळ
नाशिकचा विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण आपणच बाहेर काढले अशा फुशारक्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मारत आहेत. मुख्यमंत्र्याच्या प्रत्येक शब्दात अहंकार ठासून भरलेला दिसतो. फक्त मलाच ज्ञान, बुद्धी आहे असा त्यांचा समज असून इतर सर्वांना ते मुर्ख समजतात. मुळात एपस्टीन फाईल्सवरून लक्ष भरकटवण्यासाठी अशोक खरात फाईल उघडण्याचा त्यांचा कांगावा असावा. भोंदू अशोक खरात प्रकरण होऊच कसे दिले? मागील पाच वर्षाच्या काळात फडणवीसच गृहमंत्री होते, त्यावेळी फडणवीस झोपा काढत होते का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
खरातला भेटलेल्या प्रत्येकाची एचआयव्ही चाचणी करा – वडेट्टीवार
कॅप्टन खरातला भेटलेल्या सर्वांची सरकारनेच एचआयव्ही चाचणी करुन घ्यायला हवी’, असे विधान केले. ‘अन्यथा संसर्गजन्य रोग होऊन सर्वांचाच मृत्यू होईल, असं काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार सभागृहात म्हणाले.
