राहाता : भोंदूबाबा अशोक खरात याने समता पतसंस्थेत दोन वरिष्ठ परिवहन अधिकाऱी व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे तीन तर खरात याच्या बहीण आणि भाच्यासह नाशिक येथील वैद्यकीय व्यवसायिक दाम्पत्याच्या नावे दोन खाती उघडल्याचे पोलीस तपासात समोर आल्याची माहिती शिर्डी पोलिस ठाण्याचे निरक्षक रणजीत गलांडे यांनी दिली.

समता पतसंस्थेतील बनावट खात्यांबाबत मंगळवारी ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधितांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. या चौकशीमध्ये दोन वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्यांसह खरात याच्या बहीण आणि भाच्यासह नाशिक येथील वैद्यकीय व्यवसायिक पती-पत्नीच्या नावेही दोन खाती उघडल्याचे तपासात समोर आले आहे.

आज या ७ खातेदारांची चौकशी करुन त्यांचे लेखी जबाब नोंदविण्यात आले. समता पतसंस्थेत आमच्या नावे उघडण्यात आलेल्या खात्यांबाबत आम्हाला काहीही माहिती नाही, असा जबाब या खातेदारांनी शिर्डी पोलिसांकडे नोंदविला आहे.

शहरातील समता पतसंस्थेच्या शाखेत ५७ जणांच्या नावे १०० बनावट खात्यातून मोठे आर्थिक व्यवहार झाले असुन मागील तीन दिवसात १९ तर आज ७ असे २६ खातेदारांचे जबाब शिर्डी पोलिसांनी नोंदवले आहेत. पोलिसांनी आजपर्यंत ५७ पैकी २६ खातेधारांची चौकशी करत जबाब नोंदवून घेतले. यातील सर्वच खातेधारकांनी कागदपत्रे खरी असून सही मात्र बनावट असल्याचे सांगत व्यवहार कधी केलेच नसल्याचे जबाब दिले आहेत. या सर्व खात्यांचा वापर अशोक खरात करत असल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

या सर्व बँकेतील व्यवहारामध्ये पैसे कुणी भरले व कुणी काढले याची माहिती पतसंसंथेकडून मागविण्यात आली आहे. याचा तपशील समोर आल्यानंतर खरातच्या अडचणीत वाढ होणार आहे.