समता नावाची एक पतसंस्था आहे, त्या संस्थेत पैसे भरले किंवा काढले की मेसेज येतो. मी ही सगळी माहिती दाते सरांना देणार होते. मी जी माहिती मांडली आहे ती मी आज दुपारी त्यांना देणार आहे. सगळं काही दाते सरांना मी सांगितलं आहे असं अंजली दमानिया म्हणाल्या. राजकारण एका बाजूला ठेवा, अशोक खरातच्या विरोधात आपला लढा द्यायचा आहे हे आरोप करणाऱ्यांनी विसरु नये असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

समता संस्थेबाबत अंजली दमानियांनी काय माहिती दिली?

समता संस्थेत १ एप्रिल २०२५ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत कधी एक मेसेज यायचा, कधी दोन कधी पाच. मात्र अजित पवारांचा अपघात झाला त्याच्या एक दिवस आधी १७ मेसेज होते. २७ जानेवारी २०२६ ला १७ मेसेज आले होते. २८ जानेवारीला अजितदादांचा अपघात झाला त्यादिवशी १९ मेसेज आहेत. २९ जानेवारीला १० मेसेज आले आहेत. ३० जानेवारीला ८ मेसेज आहेत, ३१ जानेवारीला ८ मेसेज आहेत. हे दिवसाचे मेसेज आहेत. महिन्यातही जेवढे मेसेज येत नव्हते तेवढे या चार दिवसांत आले आहेत. याच्यात काय झालं त्याची चौकशी झाली पाहिजे. हे सगळे व्यवहार कुणी केले, पैशांची देवाणघेवाण कुणी केली? हे सगळं एसआयटीने शोधलं पाहिजे अशी माझी मागणी आहे असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. २७ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत सर्वाधिक मेसेज आले आहेत. पैशांची देवाणघेवाण झाली आहे, हे पैसे अशोक खरातला आले आहेत की पैसे काढले गेले, की फिरवले गेले हे सगळं यंत्रणेने शोधावं अशी माझी मागणी आहे, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांच्या अपघाताशी संबंध?

या व्यवहाराचा आणि अजित पवारांच्या अपघाताचा काही संबंध आहे असं वाटतं आहे का? असं विचारलं असता अंजली दमानिया म्हणाल्या की त्याची दाट शक्यता आहे. अमुक दिवशी किती मेसेज आलेत ते पाहिलं. दिवसाला १९ मेसेज कसे आले? समता संस्थेत काय व्यवहार झाला? याची माहिती समोर आली पाहिजे असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

मी कुठलीही खोटी माहिती दिलेली नाही, शिवाय आधी माहिती यंत्रणाना दिली मग माध्यमांना-दमानिया

मला जी काही माहिती मिळाली त्याची मी सत्यता तपासली, मग ती यंत्रणांना दिली, असंही अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. प्रत्येक वेळी समिती बसते, एसआयटी चौकशी होते पण अनेकदा खरी माहिती समोर येत नाही. एकनाथ शिंदेंनी १७ कॉल केले हे समोर आलं असतं का? रुपाली चाकणकर म्हणत होत्या की अशोक खरात गुरुस्थानी होते १७७ कॉल कुणी गुरुला का करतं का? असा प्रश्न अंजली दमानियांनी म्हटलं आहे.