राहाता : भोंदू अशोक खरात याचे नवनवीन कारनामे उघड होत असून, बुधवारी त्याने ‘स्पेशल २६’ या हिंदी चित्रपटाप्रमाणे अनेक व्यावसायिक व उद्योजकांना गंडवल्याचे उघडकीस आले आहे. खरातचे भक्त असलेले मोठे व्यावसायिक व उद्योजकांकडे तो स्वत:च बनावट प्राप्तीकर अधिकारी पाठवून तडजोडीच्या नावाखाली मोठी रक्कम उकळल्याचे उघडकीस आल्याचे अहिल्यानगर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.

खरातशी संबंधित शिर्डी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरण तसेच समता पतसंस्थेतील बनावट खाती उघडून त्यातून केलेल्या बेनामी प्रकरणाचा तपास सध्या नगर पोलिसांकडून सुरू आहे. या तपासातून अनेक गोष्टी नव्याने प्रकाशात येत आहेत. या अंतर्गतच आज तपासातून खरात याचा फसवणुकीचा हा नवा प्रकार प्रकाशात आला आहे. खरात हा ‘स्पेशल २६’ या हिंदी चित्रपटाप्रमाणे त्याचेच भक्त असलेल्या अनेक व्यावसायिक व उद्योजकांवर बनावट प्राप्तीकर अधिकाऱ्यांमार्फत छापे घालत असे. यावेळी तडजोडीच्या निमित्ताने तो मध्यस्थी करत खरात मोठी रक्कम उकळत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, शिर्डी येथील साईबाबा संस्थान कर्मचारी असलेला विकास दिवटे यांच्या आत्महत्या प्रकरणात खरात याचे नाव होते. परंतु, तपासामध्ये त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे न आढळल्याने त्याचे नाव आरोपपत्रातून वगळण्यात आले होते. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी मृत दिवटे याच्या भावाने केली आहे. याबाबत त्याने शिर्डी पोलीस ठाण्यात आज अर्ज दाखल केला.

याबाबत न्यायालयात पोलिसांकडून प्रस्ताव सादर केला असून, सरकारी वकिलांचा अभिप्राय घेऊन शिर्डी पोलीस पुढील कायदेशीर कार्यवाही करणार आहेत. शिर्डीतील रावसाहेब गोंदकर यांच्या जमीन खरेदी प्रकरणात फसवणुकीचे आणि आर्थिक गैरव्यवहारांचे पुरावे समोर आले आहे. तसेच खरात याने पतसंस्थेतील बनावट खात्यांचा वापर आर्थिक गैरव्यवहारांसाठी केल्याचे संबंधित पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.