Ashok Kharat Video Viral : अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. आता भोंदू अशोक खरातची एसआयटीद्वारे चौकशी करण्यात येत असून या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याच अशोक खरातबरोबर राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांचेही फोटो समोर आले आहेत. तसेच या भोंदू अशोक खरातची पाद्यपूजा करताना रुपाली चाकणकर यांचेही काही फोटो समोर आले होते. त्यामुळे रुपाली चाकणकरांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि अखेर त्यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तसेच राष्ट्रवादीच्या (अजित पवार) महिला प्रदेशाध्यपदाचाही राजीनामा द्यावा लागला.

भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यालयातून पोलिसांना अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ आढळून आल्याचं सांगितलं जातं. तसेच या प्रकरणातील काही आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी करण्यात येत असली तरी भोंदू अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणातील पीडित महिलांना दुहेरी त्रासाला सामोरं जावं लागत आहे. अशोक खरातच्या अटकेने या पीडितांचा त्रास संपलेला नाही. कारण या प्रकरणातील आक्षेपार्ह व्हिडीओ व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.

त्यामुळे हेच व्हिडीओ पीडितांच्या ओळखीच्या कोणीतरी किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याने पाहिले तर? ही भीती पीडितांना सतावत असल्याचं चित्र आहे. या सततच्या भीतीमुळे म्हणजे आधी लैंगिक शोषण आणि आता हे व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे या घटनेतील पीडितांना दुहेरी त्रासाला कशा पद्धतीने सामोरं जावं लागत आहे? याचं धक्कादायक वास्तव द इंडियन एक्सप्रेसने एका वृत्तात मांडलं आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.

पीडित महिलांना कशाची भीती सतावतेय?

अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणातील सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पोलिसांनी हटवण्याच्या गतीपेक्षा जास्त वेगाने व्हायरल होत आहेत. त्यामुळे पीडितांना स्वत:ची ओळख उघड होण्याची भीती जास्त वाटत आहे. अगदी स्वतःच्या कुटुंबातही. “असं काही घडेल याचा आम्ही कधीही विचार केला नव्हता”, असं एका पीडितेच्या नातेवाईकाने सांगितलं आहे.

हे व्हायरल झालेले व्हिडीओ संभाव्य साक्षीदारांनाही गप्प करत आहेत का? असाही सवाल उपस्थित होत आहे. कारण हे या प्रकरणातील पोलिसांच्या तपासात अडथळा आणत आहेत. किमान तीन पीडितांच्या कुटुंबीयांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितलं की, या सततच्या चिंतेमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.

Ashok Kharat Case

पोलिसांचं म्हणणं असं आहे की, “न्याय मिळवणं आणि त्याचे परिणाम नियंत्रणात ठेवणं ही दोन आव्हाने आता अविभाज्य झाली आहेत. काही पीडिता अजूनही पुढे येण्यास कचरत आहेत. कारण त्यांना भीती वाटते की त्यांची ओळख सार्वजनिकरित्याच नाही तर त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातही उघड होईल”, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

पोलीस सूत्रांनुसार काही पीडितांनी त्यांच्या घरातील कुटुंबालाही या अत्याचाराबाबत सांगितलं नव्हतं. त्यामुळे आता कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला असून आता कुटुंबात तणाव निर्माण झाला आहे. एवढंच नाही तर काही कुटुंबियांतील काही सदस्यांना नेमकं काय घडलंय याची जाणीव नुकतीच झाली आणि त्यामुळे त्यांनाही धक्का बसला आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका पीडितेच्या दुसऱ्या नातेवाईकाने सांगितलं की, “आमची ओळख उघड तर होणार नाही ना? अशी भिती कायम सतावते. आम्ही स्वतःला कसं सांभाळत आहोत हे फक्त आम्हालाच माहीत आहे. या परिस्थितीमुळे संपूर्ण कुटुंब हादरलं आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, नाव गुप्त ठेवण्याचं वारंवार आश्वासन देऊनही इतर अनेक पीडितांनी या घटनेवर बोलण्यास नकार दिला आहे.

Ashok Kharat Case

दरम्यान, स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात या भोंदूच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका ३५ वर्षीय महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर १८ मार्च रोजी त्याला अटक करण्यात आली. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तो महिलांना वैयक्तिक समस्या सोडवण्याचं आमिष दाखवून आपल्या कार्यालयात बोलावून घेत असे. त्यानंतर त्यांना मृत्यूची किंवा जादूटोण्याची भीती दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असे. या प्रकरणात पोलिसांनी १०० पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडीओ शोधून काढले आहेत. जे प्रामुख्याने खरातच्या कार्यालयात कॅमेरे लावणाऱ्या आणि नंतर माहिती उघड करणाऱ्या एका माजी कर्मचाऱ्याने चित्रित केलेले आहेत.

तपास अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाबाहेर झालेल्या प्रसारामुळे होणारं नुकसान अधिक वाढत आहे. कुटुंबीयांच्या मते त्यांच्या मनात असलेल्या संतापाबरोबरच ही वेदनाही अस्वस्थ करणारी आहे. एका नातेवाईकाने सांगितलं की, “आमची एकच इच्छा आहे. त्या भोंदू खरातला कठोर शिक्षा व्हावी आणि त्याने पुन्हा दिवसाचा प्रकाश पाहू नये. जर न्याय मिळाला नाही तर त्याच्याशी कसं वागायचं हे आम्हाला माहिती आहे.”

दरम्यान, या प्रकरणातील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी विशेषतः दोन एफआयआर नोंदवले आहेत. एक व्हॉट्सॲप ग्रुप्सशी संबंधित आणि दुसरा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सशी संबंधित आहे. यावरून हे व्हिडीओ एकाचवेळी किती माध्यमांमधून फिरत आहेत याचा अंदाज येतो. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितलं की, “एखादी लिंक काढून टाकली की लगेच दुसरीकडे पुन्हा दिसते. त्यामुळे हे एक अत्यंत अवघड काम बनलं आहे.”

Ashok Kharat Case

खरात प्रकरणातील तपासाबाबत एसआयटीने विविध विशेष पथकं तैनात केली आहेत. त्यामध्ये व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांचा शोध घेणं, डिजिटल पुराव्यांचं विश्लेषण करणं, तसेच ते व्हायरल व्हिडीओ त्वरित काढून टाकण्यासाठी संबंधित प्लॅटफॉर्मसोबत समन्वय साधणं आणि कायदेशीर कारवाई करणं. यामध्ये पोलिसांनी असा इशारा दिलेला आहे की, केवळ हे व्हिडीओ फॉरवर्ड करणाऱ्या व्यक्तींविरुद्धच नाही तर त्या ग्रुपच्या ॲडमिनवरही आणि सोशल मीडिया हँडलर्सविरुद्धही गुन्हे दाखल केले जातील.

पीडित महिलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं समुपदेशन

या प्रकरणामध्ये पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना सतत समुपदेशन करण्यावर देखील विशेष लक्ष दिलं जात आहे. पीडितांच्या नियमित संपर्कात राहून त्यांना आधार आणि दिलासा देण्याचं काम विशेष पथकांवर सोपवण्यात आलेलं आहे. “आम्ही संपूर्ण गोपनीयतेची हमी देत ​​आहोत. पीडितांची ओळख संरक्षित करणं हे आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे”, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.