राहाता: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढें यांनी राज्यात भेसळ करणाऱ्यांविरूद्ध धडाकेबाज कारवाई सुरू केली. या कारवाईला पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी डोक्यावर संविधान घेऊन भर उन्हात श्रीरामपूर ते शिर्डी अशी अभिनव पदयात्रा काढून लक्षवेधी पाठिंबा दिला आहे.

या पदयात्रेमुळे परिसरात संविधान, नागरिकांची जबाबदारी आणि अन्न सुरक्षा याविषयी जनजागृती होत आहे. अनेक नागरिकांनी रस्त्यावर थांबून लोंढे यांच्या आंदोलनाचे स्वागत केले. काहींनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत ही केवळ पदयात्रा नसून समाजजागृतीची चळवळ आहे, अशा प्रतिक्रिया दिल्या. तुकाराम मुंढे यांच्या भेसळमुक्त मोहिमेला मिळणारा हा लोकसमर्थनाचा आवाज प्रशासनासाठीही महत्त्वाचा मानला जात आहे.

धडाकेबाज कारकीर्दीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारतांच धडक कारवाईला सुरुवात केली. मुंढे यांनी बदलीची पर्वा न करता छापेसत्र सुरू केल्याने भेसळमाफीयांचे धाबे दणाणले आहेत. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकून भेसळ म्हणून वापरण्यात येणाऱ्या अन्न पदार्थाचा लाखो रूपयांचा साठा जप्त केला.

मुंढे यांनी वेगवेगळ्या खात्यातील गैरप्रकारांना सातत्याने चाप लावण्याचे काम केल्याने त्यांना सातत्याने बदल्यांना सामोरे जावे लागते. बदल्या होत असतानाही त्यांनी आपली कामगिरी सुरूच ठेवल्याने त्यांची जनमानसात प्रतिमा उंचावली असल्याची चर्चा आहे. त्यांच्या कार्यशैलीप्रमाणे अन्न आणि औषध विभागात रुजू झाल्यानंतर त्यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. भेसळ करणाऱ्यांविरुद्ध जोरदार मोहीम उघडल्याने भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या भेसळ मुक्त कारवाईला पाठिंबा देण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी डोक्यावर भारतीय संविधान घेऊन संविधान लिहिलेले पोस्टर व तुकाराम मुंढे समर्थनार्थ असलेले पोस्टर अंगात परिधान करून भर उन्हात वाकडी मार्गे श्रीरामपूर ते शिर्डी पायी पदयात्रा काढली आहे. लोंढे यांची पदयात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

साईबाबा त्यांना सद्बुद्धी देवो

सनदी अधिकाऱ्यांना ‘तुकाराम मुंढे’ बनण्यात रस नाही. पण थोडीफार लाज, शरम बाळगा, आपल्या कर्तव्याप्रति निष्ठा ठेवा. अब्जोपती बनण्यासाठी पुढाऱ्यांचे दलाल बनण्यात जे धान्यता मानतात, साईबाबा अशा सर्वच अधिकाऱ्यांना सद्बुद्धी देवो, भेसळमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रशासनाला समाजाने साथ दिली पाहिजे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तुकाराम मुंढे यांच्यासारखे प्रामाणिक अधिकारी काम करत असताना समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी, भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी ही पदयात्रा काढली. –अशोक लोंढे, सामाजिक कार्यकर्ते