‘प्रश्नचिन्ह’ असूनही झेप.. पुन्हा भरारी घेण्यासाठी!

शाळेचा साडेतीन एकर परिसर समृद्धी महामार्गाने ताब्यात घेतला, दोन एकर जागा संस्थेकडे शिल्लक आहे,

दानदाते आणि आश्रमशाळेतील मुलांसमवेत मतीन भोसले.

महामार्ग कामामुळे पाडलेली आश्रमशाळा लोकवर्गणीतून उभारणार

अमरावती : समृद्धी महामार्गाचे काम आता पूर्ण होत आले असले, तरी वंचितांसाठी उभारण्यात आलेल्या एका आश्रमशाळेला या महामार्गाने धक्का दिला आहे. जिल्ह्य़ातील मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आश्रमशाळेतील सहा वर्गखोल्यांची इमारत, विहीर, वाचनालय, अडीचशे झाडे, समृद्धी महामार्गामुळे उद्ध्वस्त झाल्याने आश्रमशाळेचे संस्थापक मतीन भोसले यांना आता शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. एका दूरचित्रवाणी वाहिनीवरील एका कार्यक्र मातून मिळालेला निधी आणि गोळा होत असलेल्या लोकवर्गणीच्या माध्यमातून त्यांच्या संस्थेने सरकारी जागेवर विसंबून न राहता, स्वत:ची जागा घेऊन आश्रमशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळेचा साडेतीन एकर परिसर समृद्धी महामार्गाने ताब्यात घेतला, दोन एकर जागा संस्थेकडे शिल्लक आहे, आणखी तीन एकर जागा शेजारी आहे पण शासननिर्णय प्रलंबित आहे. त्या दोन एकर जागेत तात्पुरता निवारा करून ही मुले सध्या राहताहेत. काही मुले-मुली आपापल्या नातलगाकडे गेली आणि भीक मागू लागली आहेत, त्यांना परत आणण्याचे प्रयत्न मतीन भोसले आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.

 मतीन भोसले यांनी २०१२ मध्ये प्रश्नचिन्ह आश्रमशाळा सुरू केली. मंगरूळ चव्हाळानजीकच्या एका शेतात अनेक अडथळ्यांवर मात करीत प्रयत्नपूर्वक उभारली. सध्या पहिली ते दहावी या वर्गातील मिळून १९२ मुली व २१८ मुले त्या शाळेत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून समृद्धी महामार्गाच्या आड येत असल्याने ही शाळा संकटात सापडली. पर्यायी जागा मिळावी म्हणून आणि नुकसानभरपाई मिळावी म्हणून मतीन भोसलेने सरकारदरबारी अनेक उंबरठे झिजवले, अनेक आश्वासने मिळवली. पण उपयोग झाला नाही. काही महिन्यांपूर्वी समृद्धी महामार्ग निर्माणप्रक्रियेत त्या आश्रमशाळेवर बुलडोझर फिरवण्यात आला. शाळेची दहा खोल्यांची इमारत ज्या ठिकाणी रात्रीचा मुलांचा मुक्काम होता, वाचनालय, अभ्यासिका, पारधी समाजाचे वस्तुसंग्रहालय हे सर्व पाडण्यात आले. संस्थेच्या दोन एकर जागेत तात्पुरता निवारा करून ही मुले सध्या राहत आहेत. प्रश्नचिन्ह आश्रमशाळेसमोर प्रश्न खूप आहेत. ते पूर्णत: कधीही सुटणार नाहीत, पण लोकांच्या आर्थिक सहकार्यातून ते सुस’ होऊ शकतात.

मदतीचे आवाहन

एका दूरचित्रवाणी वाहिनीवरील कार्यक्र मात १८ सप्टेंबर रोजी प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर आणि मतीन भोसले यांनी २५ लाख रुपयांचा निधी जिंकला होता. तरी हा निधी समृद्ध महामार्गामुळे उद्ध्वस्त झालेल्या संपूर्ण प्रश्नचिन्ह आश्रमशाळेच्या  प्रकल्प उभारणीसाठी अपुरा पडत असल्याने जनतेला आर्थिक मदतीसाठी आवाहन के ले जात आहे. प्रश्नचिन्ह प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी आदिवासी फासेपारधी समाजाच्या ४६२ मुलामुलींना  शिक्षण,संरक्षण व पोषण देण्यासाठी प्रकल्पाला स्वत:च्या मालकीच्या जमिनीची आवश्यकता आहे. ही जमीन खरेदी करण्यासाठी लोकवर्गणीच्या माध्यमातून  एकूण ४१ लाख रुपये जमा झाले आहेत. प्रकल्पाच्या उभारणीसाठी १.५२ कोटी निधीची आवश्यकता असल्याने मतीन भोसले यांच्या संस्थेला बळ देण्याचे आवाहन अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून आश्रमशाळेसाठी ५२ लाख रुपये देण्याचे कबूल केले होते, त्यापैकी पहिल्या टप्प्यात के वळ १७ लाख रुपये मिळाले. नंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही या आश्रमशाळेकडे दुर्लक्ष के ले. ही आश्रमशाळा उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी मतीन भोसले यांनी भरपूर प्रयत्न के ले. मुख्यमंत्र्यांपासून ते स्थानिक लोकप्रतिनिधींपर्यंत अनेकांकडे दाद मागितली. पण, आश्वासनापलीकडे काही मिळाले नाही. आता पुन्हा ‘ई- क्लास’च्या जमिनीवर आश्रमशाळा उभारली, तर के व्हाही सरकार आपला अधिकार त्या जागेवर सांगेल. ती जागा सरकारने ताब्यात घेतली, तर त्याचा मोबदलाही मिळणार नाही. त्यामुळे जागा कमी असली तरी चालेल, पण स्वत:ची हवी, असा सल्ला कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी मतीन भोसले यांना दिला. नुकताच प्रश्नचिन्ह आश्रमशाळेचा वर्धापन दिन पार पडला. मेधा पाटकर, सत्यपाल महाराज आदी या कार्यक्र माला उपस्थित होते. त्यानंतर मतीन भोसले यांनी जागेचा शोध सुरू के ला. आश्रमशाळेजवळच एक जागा मिळाली. नवीन जागी प्रश्नचिन्ह आश्रमशाळा पुन्हा उभारण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तो गोळा करण्यासाठी मतीन भोसले आणि त्यांचे सहकारी प्रयत्न करीत आहेत.

लोकांचे पाठबळ

एका मासिकाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला व सुमारे सहा लाख रुपयांचा निधी हा प्रश्नचिन्हच्या जमीन खरेदीसाठी जमा झाला. नुकतेच नागपूर येथील अरुण इंगोले दांपत्याने प्रश्नचिन्ह प्रकल्प उभारणीसाठी एक लाख रुपयांचा निधी देणगी स्वरूपात दिले आहेत. अनेक लोक आर्थिक मदतीसाठी पुढे येत आहेत.

मतीन भोसले, संस्थापक, प्रश्नचिन्ह आश्रमशाळा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ashram school demolished due to highway work will be rebuilt by people fund zws