आश्रमशाळा अधीक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; पीडित मुलगी नागपूरच्या रुग्णालयात दाखल

या प्रकरणी आश्रमशाळेचा अधीक्षक संजय एकनाथ इटनकर (५३) याला पोलिसांनी अटक केली आहे.

आश्रमशाळा अधीक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; पीडित मुलगी नागपूरच्या रुग्णालयात दाखल
सांकेतिक फोटो

चंद्रपूर/वर्धा : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील बरांज तांडा येथील घमाबाई प्राथमिक माध्यमिक निवासी आश्रमशाळेत चाकूचा धाक दाखवून आठव्या वर्गातील एका १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी आश्रमशाळेचा अधीक्षक संजय एकनाथ इटनकर (५३) याला पोलिसांनी अटक केली आहे. १० ऑगस्टपर्यंत त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पीडितेचे पालक चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील असून काही महिन्यांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात राहायला आलेत. त्यांनी आपल्या मुलीला निवासी आश्रमशाळेत पाठवले होते. मुलीची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत शाळा प्रशासनाचे प्रमुख म्हणून इटनकर याने तिला परत नेण्याची सूचना पालकांना केली. त्यानुसार मुलीला घेऊन पालक त्याच दिवशी हिंगणघाटला आले. घरी आल्यावर प्रकृतीची विचारपूस केली असता मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार कथन केला. यानंतर पालकांनी मुलीला उपजिल्हा रुग्णालयात नेले. वैद्यकीय तपासणी झाली. त्यात मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हिंगणघाट पोलिसांनी ३७६ व पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करत संजय इटनकर यास अटक केली.

आमदार समीर कुणावार यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच सदर आश्रमशाळेची मान्यता रद्द करावी म्हणून पाठपुरावा करणार असल्याचे कुणावार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तुकाराम पवार अध्यक्ष असलेल्या संस्थेच्या वतीने ही शाळा चालवली जाते.  सर्वप्रथम हे प्रकरण भद्रावती पोलीस ठाण्यात गेले होते; परंतु संस्थाचालक हे प्रकरण उघडकीस येऊ नये यासाठी प्रयत्नरत होते. िहगणघाट पोलिसांनी अधीक्षक इटनकर याला अटक करताच शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी आयुश मोपानी म्हणाले, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पीडित मुलीचा जबाब नोंदवायचा आहे. तिला मानसिक धक्का बसला असल्याचेही त्यांनी सांगितले. पीडित मुलीचे वडील म्हणाले, मुलीला नागपुरातील रुग्णालयात दाखल केले आहे. मुलीची प्रकृती ठीक झाल्यानंतरच आपण माध्यमांशी बोलू.

इतरही मुलींची वैद्यकीय तपासणी

या निवासी आश्रमशाळेत एकूण ३६० विद्यार्थी आहेत, त्यापैकी १२० विद्यार्थिनी आहेत. या शाळेतील सर्व १२० मुलींची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यात जर आणखी काही मुलींची प्रकरणे समोर आली तर या शाळेत हा प्रकार किती वर्षांपासून सुरू आहे याचाही शोध घेतला जाणार आहे. पोलीस आणि समाजकल्याण विभागाच्या वतीने ही तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन हादरले आहे.

रुग्णालयाचा अहवाल नकारात्मक कसा?

नागपूर : पीडितेच्या हिंगणघाटच्या शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय तपासणीत बलात्काराबाबतचा अहवाल नकारात्मक आला. परंतु दोन दिवसांनी हा अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे हिंगणघाट रुग्णालयातील प्रक्रियेची चौकशी करून दोषींवर कारवाईचे संकेत राज्य महिला आयोगाकडून दिले गेले. भंडारा बलात्काराच्या पीडितेच्या प्रकृतीची पाहणी करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकनकर सोमवारी नागपुरात आल्या होत्या. या वेळी त्यांनी आश्रमशाळेत बलात्कार झालेल्या पीडितेचीही भेट घेतली. या भेटीनंतर चाकनकर म्हणाल्या, या घटनेची मुलीच्या पालकांसह पोलिसांकडून माहिती घेतली असता हिंगणघाटच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या वैद्यकीय चाचणीत बलात्काराबाबतचा अहवाल आधी नकारात्मक आल्याचे कळले. दोन दिवसांनी मात्र तपासणीचा अहवाल सकारात्मक आला. या गोंधळात गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला. हा सगळा प्रकार बघितल्यास यंत्रणेत दोष दिसतो. त्यामुळे रुग्णालयातून या प्रकरणाचा अहवाल मागितला जाईल. दोषी आढळलेल्यांवर कारवाई केली जाईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“सरकारला पाठिंबा दिला याचा अर्थ…” मनसे आमदार राजू पाटलांचा एकनाथ शिंदेंना इशारा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी