आश्रमशाळांमधून पाचवी ते दहावीपर्यंत गणित व विज्ञान हे विषय इंग्रजी माध्यमातून शिकविण्यास आदिवासी विकास खात्याने परवानगी दिली आहे. आदिवासी विकास खात्यांतर्गत राज्यात ५५६ अनुदानित आश्रमशाळा स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जातात.
या शाळांमधून हे विषय पूर्णत: इंग्रजीतून नाही, तर सेमी इंग्रजीत शिकविले जातील. हे विषय इंग्रजीतून शिकविणे बंधनकारक नसून ऐच्छिक स्वरूपात शिकविले जाणार आहेत. असे असले तरी शासनाने यास काही अटी घालून दिल्या आहेत. संबंधित शैक्षणिक संस्थांची विषय शिकविण्याची क्षमता व पालकांची इच्छा विचारात घेऊनच हा निर्णय संबंधित संस्थांनी घ्यावा, असे शासनाला वाटते. गणित व विज्ञान हे विषय सेमी इंग्रजीतून शिकविण्यासाठी शिक्षकांची अतिरिक्त पदे निर्माण केली जाणार नाहीत, तसेच या विषयांसाठी कुठलेही अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून दिले जाणार नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये वापरली जाणारी पुस्तके पाचवी ते दहावीपर्यंतच्या वर्गामध्ये, तसेच हे विषय इंग्रजी भाषेतून ऐच्छिक स्वरूपात शिकवायचे झाल्यास तशी माहिती संबंधित अप्पर आयुक्त व प्रकल्प अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची ग्रहण क्षमता पाहता, तसेच विद्यार्थ्यांअभावी मराठी तुकडय़ांची कमी होणारी संख्या पाहूनच शासनाने इंग्रजी विषयात शिकविण्याची परवानगी देताना ती बंधनकारक न करता ऐच्छिक केली असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सेवानिवृत्त सहपोलीस आयुक्त आणि आदिवासी क्षेत्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कंगाले यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा शासनाचा हा निर्णय चांगला आहे. या योजनेची अंमलबजावणी प्रामाणिकपणे झाल्यास, तसेच आदिवासींनीही त्याचा सदुपयोग करून घेतल्यास ही मुले उच्चपदांवर नोकरी करीत असताना दिसतील, अशी आशा कंगाले यांनी व्यक्त केली.